राकेश घानोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीने हयातीत असलेल्या पहिल्या पतीशी अधिकृतरीत्या घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्यास ते लग्न निरर्थक व अवैध ठरते असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला.प्रकरणातील पत्नी प्रियाने हयातीत असलेल्या पहिल्या पतीशी अधिकृतरीत्या घटस्फोट न घेता हितेशसोबत २४ डिसेंबर २०१३ रोजी दुसरे लग्न केले होते. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली. प्रियाची कुटुंबातील अन्य सदस्यांसोबतही सतत भांडणे होत होती. प्रियासोबतचे वाद मिटविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. परिणामी, हितेशने प्रियाच्या गत आयुष्याची चौकशी सुरू केली. दरम्यान, त्याला प्रियाचे आधीच लग्न झाले होते हे कळले.प्रिया पहिल्या पतीपासून गर्भवतीही राहिली होती. परंतु, तिने गर्भपात केला होता. तसेच, तिने पहिल्या पतीशी घटस्फोट घेतला नाही अशी माहिती हितेशला मिळाली. ही माहिती प्रियाच्या कुटुंबीयांनी हितेशपासून लपवून ठेवली होती. त्यामुळे हितेशने वरील मुद्याच्या आधारावर प्रियापासून घटस्फोट मिळवला.
पत्नीचे अपील फेटाळलेहितेशने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. हयातीत असलेल्या पहिल्या पतीसोबत प्रियाचा अधिकृतरीत्या घटस्फोट झाला नसल्याची बाब लक्षात घेता २९ जून २०१८ रोजी कुटुंब न्यायालयाने हितेशची याचिका मंजूर केली. त्या निर्णयाविरुद्ध प्रियाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनीही कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून प्रियाचे अपील फेटाळून लावले.