लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लालगंज चकना चौक येथील बावली विहीर काही दिवसांपूर्वीपर्यंत कचऱ्याने भरली होती. परिसरातील काही नागरिकांच्या सक्रियतेमुळे या विहिरीच्या सफाईसाठी २३ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. चार दिवसांपासून विहिरीची सफाई सुरु आहे. सफाईसोबतच या विहिरीतील अनेक रहस्यही पुढे येत आहेत. विहिरीत एक गुप्त दरवाजा सापडला आहे. ते पाहण्यासाठी दूरवरून लोक गर्दी करीत आहेत.परिसरातील वयोवृद्ध नागरिकांचे म्हणणे आहे की, गोंड राजाने या विहिरीचे बांधकाम केले होते. या विहिरीतून एक रस्ता रामटेक येथील ‘सीता की नानी का कुआं’ नावाच्या विहिरीत जाऊन उघडत असल्याचे सांगितले जाते. गोंडकालीन ही विहीर अतिशय खोल आहे. अजूनही सफाई सुरु आहे. विहिरीच्या सफाईसाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांपैकी एक असलेले मनीष उमरेडकर यांनी सांगितले की, चार दिवसाच्या सफाईत विहिरीत अनेक दरवाजे दिसून येत आहेत. यातील पाणीही अतिशय शुद्ध आहे. सफाईनंतर या विहिरीचे पाणी परिसरातील जवळपास ५०० लोकांना पिण्यायोग्य उपलब्ध होऊ शकते. प्रभाग २१ मध्ये येणाऱ्या या विहिरीची रचना अतिशय सुंदर आहे.