नागपूर : नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील छावणी परिषदअंतर्गत असलेल्या कमसरी बाजार परिसरातील प्राचीन राम मंदिराच्या पायथ्याशी खोदकाम करण्यात आल्याचे आढळून आले. हे खोदकाम गुप्तधन शोधण्याच्या हेतूने करण्यात आल्याचा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार कमसरी बाजार वस्ती येथे पुरातन प्राचीन राम मंदिर आहे. ७ फेब्रुवारीला न्यू येरखेडा रहिवासी माजी सैनिक मनबहादूर भंडारी हे पत्नीसह मंदिरात गेले होते. १२ फेब्रुवारीला असलेल्या कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मंदिराची साफसफाई करण्याच्या उद्देशाने ते गुरुवारी सकाळी १० वाजता मंदिरात गेले होते. या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने पायथ्याशी त्यांना खोदकाम केल्याचे दिसून आले. तिथे त्यांना खोदकाम करण्याचे साहित्यही आढळून आले. हे खोदकाम मध्यरात्री करण्यात आले असून गुप्तधन शोधणाऱ्या टोळीने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सदर पुरातन राम मंदिर लोकवस्तीच्या दूर आहे. निर्जन स्थळ असल्याने भामट्यांचा येथे वावर असतो. हे खोदकाम करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी सैनिक मनबहादूर भंडारी, राजेश कास्त्री, गजानंद महाराज, सोमो अली, दिलीपकुमार प्रजापती, स्वरूप बोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात नवीन कामठीचे ठाणेदार संतोष वैरागडे यांना विचारणा केली असता याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सदर प्रकाराची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.