नागपूर : मराठा आरक्षण आणि त्या अनुषंगाने झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका त्यातच नक्षलग्रस्त भागात मिळालेला थ्रेट लक्षात घेता या मतदान शांततेत पार पाडण्याचे आव्हान नागपूर-विदर्भातील सुरक्षा यंत्रणांनी स्वीकारले आहे. त्याअनुषंगाने सर्व प्रकारची खबरदारी घेत पोलिस पुढचे ४८ तास अविश्रांत कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर या निवडणुका लढल्या जात नसल्या तरी सर्वच राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते प्रचंड हिरिरीने ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवतात. साम-दाम-दंड-भेद या सर्वच धोरणाचा वापर केला जातो. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे एक वेगळीच स्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर रविवारी विदर्भात ठिकठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे यावेळी निवडणुकांच्या बंदोबस्ताचे स्वरूपही बदलविण्यात आले आहे. विदर्भात सर्वाधिक राजकीय संवेदनशील जिल्हा म्हणून अर्थातच नागपूर जिल्ह्याचे नाव आहे.
माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विविध पक्षाचे आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार असे सर्वच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांशी जुळले असल्याने पोलिसांनी अत्यंत सतर्कपणे मतदान आणि नंतर निकालाच्या बंदोबस्ताची व्यूहरचना केली आहे. बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील ८०० पोलिस, बाहेरून आलेले १५ अधिकारी आणि २५० पोलिस कर्मचारी तसेच १०१८ होमगार्ड शुक्रवारी रात्रीपासून कर्तव्यावर लागले आहेत.
रविवारी मतदानाचा दिवस आणि त्यानंतर निकालाच्या रात्रीपर्यंत हे सर्व अविश्रांत कर्तव्य बजावणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अतिरिक्त अधीक्षक संदीप पखाले आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बंदोबस्ताची मिनट टु मिनट रिपोर्टिंग घेत आहेत. निवडणुका असो की आणखी काही विदर्भात सर्वाधिक संवेदनशील म्हणून नक्षलग्रस्त गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याचे नाव पुढे येते. या भागातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना थ्रेट आहे. त्यामुळे खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील आणि गडचिरोली गोंदिया जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांसह त्यांचे सर्व सहकारी सुरक्षेच्या खास उपाययोजना करण्यात गुंतले आहेत.
एटापल्ली, फेंडरीकडे विशेष व्यवस्था
नक्षलग्रस्त भागातील एटापल्ली आणि फेंडरीसह सात ठिकाणी नक्षली उपद्रवाचे संकेत असल्याने त्या भागाला सुरक्षेचे खास कवच घालण्यात आले आहे. निर्धोकपणे या निवडणुका पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती या अनुषंगाने नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख आणि गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. कोटगुल, पेंढरी, मुरुमगांव, राजाराम खंडला, देचालीपेटा, रेगुंठा, वेंकटपूर आणि मन्नेराजाराम आदी गावात ईव्हीएम तसेच पोलिंग पार्टी हेलिकॉप्टरने पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.