कळमेश्वर : शहरासह तालुक्यातील माेठ्या गावांमध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांचे एटीएम आहेत. यातील ग्रामीण भागातील एटीमध्ये नियमित रकमेचा भरणा केला जात नसल्याने बॅंक खातेदारांना त्रास हाेत आहे. दुसरीकडे या एटीएम खाेलीत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात न आल्याने त्यांची सुरक्षाही वाऱ्यावर आहे.
कळमेश्वर हे तालुक्याचे, तर तालुक्यातील माेहपा हे नगर परिषदेचे शहर आहे. याशिवाय, तालुक्यातील गाेंडखैरी, धापेवाडा यासह अन्य माेठ्या गावांमध्ये भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बॅंक, सेंट्रल बॅंक या प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांसह काही सहकारी व खासगी बँकांचे एटीएम आहेत. यातील काही एटीएममध्ये रकमेचा भरणा करण्याकडे लक्षच दिले जात नाही. त्यामुळे बॅंक खातेदारांना कधी रक्कम असलेल्या एटीएमचा शाेध घ्यावा लागताे, तर कधी रकमेची उचल करण्यासाठी बॅंक शाखांमध्ये जावे लागते. काेराेना संक्रमण लक्षात घेता बॅंकेत जाणे याेग्य नसल्याचेही काही खातेदारांनी सांगितले.
यात प्रत्येक एटीएममध्ये सुरक्षारक्षकांचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे एटीएमच्या खाेलीची नियमित साफसफाई केली जात नाही. खातेदारांना विश्वासात घेत त्यांचे एटीएम कार्ड बदलविण्याचे तसेच परस्कापर रकमेची उचल करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असताना अनेक एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे पाेलिसांना तपास कार्यात सीसीटीव्ही फुटेची फारशी मदत हाेत नसल्याने यात सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे.