नागपूर : मराठा आरक्षणाचे आंदोलन आता शांत झाले आहे. या दरम्यान राज्य सरकारने ७ डिसेंबरपासून नागपूरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ८ डिसेंबरला मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची घोषणा केली आहे. अधिवेशनासाठी वापरण्यात येणाऱ्या ईमारतीचे सिक्युरिटी ऑडिट करण्यासंबंधाने आवश्यक दिशा-निर्देश देण्यात आले आहे.
पोलिसांच्या विशेष पथकाने सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी)च्या अधिकाऱ्यांसोबत विधान भवन, आमदार निवास, रवी भवन, देवगिरी, रामगिरी आदी ठिकाणचे निरीक्षण केले आहे. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बाबींचा आढावा घेऊन येथील सीसीटीव्ही कॅमेरांचीही पाहणी करण्यात आली.
या पथकांनी विधानभवनाच्या चारही दारांवर वॉच टॉवर तयार करण्याचे आदेश दिले. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी 'देवगिरी'तही खास उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, आत आणि बाहेर पडण्याचे मार्ग अधिक प्रशस्त करण्याचे निर्देश देण्यात आले. कॉटेज क्रमांक २९ आणि ३० च्या मागे पार्किंगची व्यवस्था करण्याचे आणि आगंतुकांना थांबण्यासाठी एक नवीन शेड तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री निवास रामगिरीतील काही दारं ढिले असल्याचे दिसून आल्याने त्यांना मजबूत करून सर्व स्थानांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश देण्यात आले.
लवकरच सुरू होणारे काम
पीडब्ल्यूडीच्या सूत्रांनुसार, देवगिरीत लवकरच काम सुरू होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी ही सर्व कामे पूर्ण केली जाईल. हा एक नियमित सुरक्षा आढावा होता. विधानभवन सचिवालयाची चमू येथे पोहचल्यानंतरही पुन्हा सिक्युरिटी ऑडिड केले जाईल.