नागपूर : देशभरात ‘पीएफआय’च्या विविध ठिकाणांवर छापे टाकण्यात येत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयासह मोठे पदाधिकारी त्यांच्या निशाण्यावर असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी महाल येथील संघ मुख्यालय तसेच रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसराची सुरक्षा वाढविली आहे. देशभरात ‘पीएफआय’वर छापे सुरू असताना शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षाव्यवस्थेचे ‘ऑडिट’ करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
संघ मुख्यालय हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहे. संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ल्याचादेखील प्रयत्न झाला होता. सद्यस्थितीत संघ मुख्यालयात केंद्रीय यंत्रणांची सुरक्षा असली तरी ‘पीएफआय’कडून असलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेचे कडे वाढविले आहे. संघ मुख्यालयाची सुरक्षा ही पोलिसांसाठी ‘टॉप प्रायोरिटी’ आहे. त्यादृष्टीने आम्ही सुरक्षाव्यवस्था वाढविली आहे. शहरात अनुचित प्रकार होणार नाही. जर यदाकदाचित एखादी घटना झाली तर त्याचा त्वरित सामना करण्यासाठी आमचे कमांडो व पथक तयार आहेत, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दोन वर्षांच्या कालावधीनंतर दीक्षाभूमी येथे ५ ऑक्टोबर रोजी धम्मचक्रप्रवर्तन दिनी लाखो अनुयायी येण्याची शक्यता आहे. दीक्षाभूमीसह ड्रॅगन पॅलेसलादेखील गर्दी असते. पोलिसांनी या दोन्ही ठिकाणांच्या सुरक्षेचादेखील आढावा घेतला आहे.