लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चिखल हटवण्यावरून झालेल्या शुल्लक वादात एका युवकाने कार्यालयातील सुरक्षा रक्षकाचा खून केला. ही घटना कळमना येथील चिखली ले आऊट येथे रविवारी घडली. पोलिसांनी आरोपी गोलू वासनिक (२१) रा. मानेवाडा याला अटक केली आहे. नारायण भिवापूरकर (५०) रा. कोष्टीपुरा, भांडेवाडी असे मृताचे नाव आहे.मृत भिवापूरकर हे कळमन्यातील मेहता धर्मकाटा येथील कार्यालयात सुरक्षारक्षकाचे काम करीत होते. तर गोलू वासनिक हा त्याच कार्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर होता. नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता भिवापूरकर कामावर आले. पावसामुळे धर्मकाट्यावर चिखल पसरला होता. गोलूने भिवापूरकरला चिखल साफ करण्यास सांगितले. भिवापूरकरने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. यावरून गोलूने त्याच्याशी वाद घातला. परंतु भिवापूरकरने लक्ष दिले नाही. यावरून गोलू दिवसभर टोमणे मारत होता. तरीही त्यांनी लक्ष दिले नाही. दुपारी गोलू जेवण करायला गेला. तो सायंकाळी ५ वाजता परत आला. काही वेळ कार्यालयात बसल्यानंतर गोलूने फावडा हातात घेतला. त्यावेळी भिवापूरकरही कार्यालयातच बसून होते. गोलूने फावड्याने भिवापूरकरवर हल्ला केला. त्याने भिवापूरकरच्या डोक्यावर पाच-सहा वार केले. यात भिवापूरकर गंभीर जखमी झाले. त्यांचा आरडाओरड एकूण धर्मकाट्यावरील कर्मचारी शेखर गजभिये धावून आला. परंतु गोलूने त्याच्यावरही हल्ला केला. शेखरने स्वत:चा जीव वाचवला. गोलू त्याला मध्ये पडल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाला. शेखर आणि त्याच्या साथीदारांनी भिवापूरकरला लगेच वर्धमाननगर येथील राधाकृष्ण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. उपचारादरम्यान भिवापूरकर यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गोलूचा शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पत्नी व मुलगी मानसिक धक्कयातगोलू आणि भिवापूरकर यांच्यात सकाळपासूनच वाद सुरू होता. इतर कर्मचाऱ्यांनाही याची कल्पना होती. परंतु याला शुल्लक वाद समजून कुणीही गांभीर्याने घेतले नाही. भिवापूरकरच्या कुटुंबात पत्नी जीजाबाई आणि एक विवाहित मुलगी रेणुका आहे. जीजाबाई गृहिणी आहे. भिवापूरकर यांच्याच भरवशावर घर चालत होते. या घटनेनंतर पत्नी जीजाबाई व मुलगी रेणुका यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.गोलू हा सकाळपासूनच बदला घेण्याचा तयारीत असावा असा संशय आहे. जेवण करून आल्यानंतर तो ज्या पद्धतीने भिवापूरकरला पाहत होता, त्यावरून ही बाब आढळून येते. खुनाची ही घटना कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
चिखल हटवण्यावरून नागपुरात सुरक्षा रक्षकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 8:29 PM
चिखल हटवण्यावरून झालेल्या शुल्लक वादात एका युवकाने कार्यालयातील सुरक्षा रक्षकाचा खून केला. ही घटना कळमना येथील चिखली ले आऊट येथे रविवारी घडली.
ठळक मुद्देकळमन्यातील घटना : आरोपी तरुणास अटक