नागपूर : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना येथील पं.जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड नागपूर शहराच्या वैभवात आणि उत्पन्नात भर घालणारा, आशिया खंडातील सर्वात मोठा, सर्व सोयी आणि सुविधांनी परिपूर्ण असलेला, लाखो मेट्रिक टन कृषिमालाची खरेदी-विक्री करणारा आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा बाजार आहे, असा गौरव नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेबसाइटवर करण्यात आला आहे. वेबसाइटवर दिलेल्या गौरवातील सर्व सोयी व सुविधांनी परिपूर्ण असल्याचा केलेला दावा मात्र मंगळवारी मध्यरात्री मिरचीच्या यार्डला लागलेल्या आगीने फोल ठरविला आहे. ‘लोकमत’ने कळमना मार्केटच्या ११४ एकर परिसरांतील कृषिमालाच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला असता, येथे अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे उघड झाले.
देशभरातून आणि देशाबाहेरूनही कृषिमाल या कळमना मार्केटात येतो. लाखो शेतकरी, हजारो अडत्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो. कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न होते. कोट्यवधीचे धान्याची विल्हेवाट लागेपर्यंत कृषिमाल यार्डमध्ये साठविला जातो. त्यामुळे या कृषिमालाची सुरक्षा महत्त्वाची आहे. अवाढव्य परिसर आणि मोठाले २६ यार्ड, ज्यूट आणि प्लास्टीकच्या पोत्यांमध्ये भरलेला खचाखच कृषिमाल धान्य बाजार, आलू-कांदे बाजार, मिरची बाजार, फळ बाजारात आहे. त्याचबरोबर, गुरांचा बाजारही येथे आहे, पण आगीच्या संदर्भात उपाययोजना येथे शून्य आहे. मिरचीच्या यार्डमध्ये लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याची सांगण्यात येते. येथे मोठ्या संख्येने मजूर काम करतात. सिगारेट, बिडी ओढतात, छोट्या-मोठ्या कॅन्टीन येथे उघड्यावर आहे. फळ, भाज्यांचा कचरा येथे मोठ्या प्रमाणात निघतो. कचऱ्याला आगी लागल्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत. विद्युत संयंत्र येथे आहे.
- अग्निरोधक यंत्रच नाहीत
ज्या यार्डमध्ये मिरची जळाली, तिथे फायर एक्स्टिंग्विशर लटकविण्यासाठी अँगल लावले होते, पण तिथे फायर एक्स्टिंग्विशर चोरून नेल्याचे सांगण्यात आले. इतरही यार्डचे निरीक्षण केले असता, तिथेही अग्निरोधक संयंत्र नव्हते. अडत्यांच्या कार्यालयात आणि समितीच्याही कार्यालयात अग्निरोधक संयंत्र दिसून आले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पाण्याच्या टाक्या आहेत, पाणीही मुबलक आहे, पण फायर हायड्रेन सीस्टिम एकाही यार्डला नाही. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवरच मार्केटची सुरक्षा आहे.
- १९९२ मध्येही लागली होती आग
१९७४ मध्ये नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रस्थापित झाली. १९८१ मध्ये बाजार समितीला नागपूर सुधार प्रन्यासने ११० एकर जागा दिली.
१९९२ मध्ये पं.जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डचे बांधकाम पूर्ण झाले. १९९२ मध्ये मिरचीच्या यार्डमध्ये अशीच आग लागली होती. त्यानंतरही अग्निरोधक यंत्रणा येथे लावण्यात आली नव्हती. याच वर्षात मार्केटच्या कचऱ्यामध्ये आग लागली असल्याचे कळमना अग्निशमन कार्यालयातून सांगण्यात आले.
माती परीक्षण केंद्र
- आता कृषिमालाच्या सुरक्षेचा विषय समितीने गंभीरतेने घेतला. दुसऱ्याच दिवशी आर्किटेकला बोलावून संपूर्ण यार्डात अग्निशमन यंत्रणा बसविण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. ७ दिवसांत आर्किटेकने आराखडा दिल्यानंतर तो संचालक मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल आणि लवकरात लवकर कळमना मार्केट अग्निशमन यंत्रणेने स्वयंपूर्ण होईल. स्वत:ची अग्निशमनची गाडी २४ तास येथे उपलब्ध राहिल.
अहमदभाई करीमभाई शेख, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर.