नागपूर : कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ‘डीआरएम’ कार्यालय बंद करण्यात आले. परंतु कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडले असल्याची स्थिती असून, १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कोरोनाची लगण होऊ नये यासाठी १६ ते ३० एप्रिल दरम्यान ‘डीआरएम’कार्यालय बंद करण्यात आले. त्यानंतरही कर्मचाऱ्यांना एक दिवस ड्युटी, एक दिवस वर्क फ्रॉम होमचा आदेश देण्यात आला. केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याचे निर्देश असताना, इतर विभागातील १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. कॅरेज अँड वॅगन विभाग, मेंटेनन्स विभागातील १०० टक्के कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करीत आहेत. ट्रेन लायटिंग डिपार्टमेंटमधील सर्व कर्मचारी कामावर आहेत. तसेच वाणिज्य विभाग, टीआरडी, अभियांत्रिकी, इलेक्ट्रिक लोकोशेड, गार्ड, लोकोपायलट हे सुद्धा कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची भीती या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कोरोनामुळे ‘डीआरएम’ कार्यालय बंद करू शकता, मग एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्याची काय गरज आहे? असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत.
रेल्वेत काम करणे गरजेचे आहे. परंतु एक दिवस काम आणि एक दिवस सुटी असा निर्णय घेतल्यास कर्मचारी सुरक्षित राहू शकतात. रेल्वे प्रशासन उदासीन असल्यामुळे कर्मचाऱ्यांना रोज कामावर बोलाविण्यात येत असून, त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.
- वीरेंद्र सिंह, विभागीय अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नागपूर विभाग