नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात विविध ठिकाणी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मिहान परिसरातील मुख्य कार्यक्रमस्थळ, झीरो माईल मेट्रो स्थानक, फ्रीडम पार्क तसेच रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरूप आले आहे. नागपूर पोलिसांसोबतच केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी व जवानदेखील सज्ज झाले असून, विविध पातळ्यांवर समन्वय साधण्यात येत आहे.
पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान रविवारी शहराच्या सीमा चार तासांसाठी सील करण्यात येणार आहेत. विविध यंत्रणांचे जवळपास चार हजार अधिकारी - जवान सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय एनएसजी आणि फोर्स वनच्या जवानांचे पथकदेखील पोहोचले आहे.
शुक्रवारी सुरक्षायंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानक, फ्रीडम पार्क, उड्डाणपूल, खापरी मेट्रो स्थानक, मिहान येथील कार्यक्रमस्थळ तसेच समृद्धी महामार्गाचा आढावा घेतला. या ठिकाणी आवश्यक प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीडीडीएसच्या पथकामार्फतही तपासणीला सुरुवात झाली आहे. याचप्रमाणे पंतप्रधान ज्या मार्गावरून प्रवास करणार आहेत तेथेदेखील जागोजागी दुपारीच पोलिस तैनात करण्यात आले. वर्धा मार्गावरील सर्व प्रमुख चौक, झीरो माईल येथेदेखील पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांचे एकत्रीकरण
बंदोबस्तासाठी बाहेरील शहरांतूनदेखील अधिकारी व कर्मचारी आले आहेत. समन्वयाच्या दृष्टीने शुक्रवारी पोलिस लाईन येथील मैदानात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
प्रवाशांची उडणार तारांबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपुरात आगमन होण्याच्या अगोदरपासूनच शहराच्या सीमा सील होतील. याशिवाय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गांवरदेखील बॅरिकेटिंग करण्यात येईल. त्यामुळे सकाळी विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना अगोदरच तसे नियोजन करावे लागणार आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून पाहणी
पंतप्रधान हे मेट्रोने प्रवास करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गालगतच्या उंच किंवा त्याला समांतर असलेल्या इमारतींवरही बंदोबस्त राहणार आहे. शुक्रवारी काही इमारतींची सुरक्षायंत्रणांनी पाहणी केली.
...अशी वाहतूक वळविणार
- अमरावतीमार्गे वर्धा व जबलपूरमार्गे अमरावतीकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांसाठी झिरो पाॅईंट ते समृद्धी महामार्ग (वायफळ टोल प्लाझा), हिंगणा गावकडून झिरो पाॅईंटकडे येणारा मार्ग वाहतुकीस बंद राहील.
- अमरावती मार्गावरून वर्धाकडे जाणारी वाहतूक ही मोंढा फाटा येथून उजवे वळण घेऊन कान्होलीबारामार्गे बुटीबोरी मार्गाने वळविण्यात येईल.
- अमरावतीमार्गे जबलपूरला जाणारी वाहतूक व भंडारामार्गे वर्धा, अमरावतीकडे जाणारी वाहतूक पारडी चौक, ऑटोमोटिव्ह चौक, मानकापूर चौक, नवीन काटोलनाका चौक, दाभा टी पाॅईंट, वाडी टी पाॅईंट, अमरावती रोड या मार्गाने वळविण्यात येईल.