योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत सोमवारी झालेल्या जाळपोळ, हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी कथित सूत्रधार फहीम खान शमीम खानसोबत सहा जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. याअंतर्गतच्या दाखल गुन्ह्यांत आरोपींच्या संख्येत वाढ होऊ शकते. या सर्व आरोपींनी हिंसाचाराचे उद्दात्तीकरण इतरांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या दंगलप्रकरणात सोशल माध्यमांचा उपयोग करून हिंसेला चिथावणी देण्याबाबत सायबर पोलीस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत.
सायबर पोलीस उपायुक्त लोहीत मतानी यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी तीन पोलीस ठाण्यांत सहा गुन्हे दाखल केले होते व आरोपींमध्ये बाराशेहून अधिक जणांचा समावेश होता. मात्र ही दंगल भडकविण्यासाठी सोशल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला होता. पोलिसांनी विविध व्हिडीओ, पोस्ट इत्यादींच्या माध्यमातून सखोल तपास केला. त्यात फहीम खानसह सहा जणांनी हिंसाचाराचे उदात्तीकरण करत इतरांनादेखील तसेच करण्याबाबत पोस्ट केल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या फहीम खान पोलीस कोठडीत आहे. सायबर पोलीस ठाण्याकडून प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येईल.
२३० पोस्टचा शोध, १७२ हॅंडलर्स
सायबर पोलिसांच्या चौकशीनंतर २३० आक्षेपार्ह व हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या सोशल माध्यमांवरील पोस्टचा शोध घेण्यात आला. तर १७२ हॅंडलर्सकडून हे प्रकार झाले होते. ५० हून अधिक आरोपींची नावे स्पष्ट झाली असून त्यांच्यावर एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत.
ट्विटर, मेटा, इन्स्टाकडून मागविली माहितीअनेक खातेधारक अज्ञात आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट, व्हिडीओज तसेच त्यांच्या खात्यांचे तपशील सायबर पोलीस ठाण्याकडून ट्विटर, मेटा, इन्स्टाग्राम तसेच यूट्यूबकडून मागविण्यात आले आहे. तसेच त्यांना आक्षेपार्ह व्हिडीओ डिलीट करण्याचीदेखील विनंती करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास ६० टक्के व्हिडीओ डिलीटदेखील झाले आहेत, असे मतानी यांनी स्पष्ट केले. माहिती आल्यानंतर त्या आधारे आरोपींच्या संख्येत वाढ होईल, असेदेखील त्यांनी सांगितले.