नागपूर : सावनेर येथील न्यायालय १९२१ पासून कार्यरत असून शतकोत्तर प्रतीक्षेनंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येथे दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापित झाले आहे. या न्यायालयामुळे नागरिकांना नागपूर येथे ये-जा करताना होणारा होणारा त्रास कमी होऊन खटल्यांना होणारा विलंब टाळता येईल व आपले वाद गावातच सोडविता येतील. या न्यायालयामुळे जबाबदारीत वाढ होणार असून आनंदी व खेळकर वातावरणात वाद सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी केले.
सावनेर येथे वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती वाल्मीकी एस.ए. मेनेझेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल होते. तालुका वकील संघाच्या अध्यक्षा पल्लवी मुलमुले, दिवाणी वरिष्ठस्तर न्यायाधीश नायगावकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
न्यायदानाचा एक यशस्वी प्रयत्नासाठी एक शतक ओलांडावे लागले आहे. वरिष्ठ न्यायालयामुळे जबाबदारीत वाढ होणार असून अनावश्यक गोष्टी टाळाव्या, स्पर्धात्मक वातावरण न ठेवता खटल्यांना विलंब होणार नाही याकडे लक्ष द्यावे. पक्षकारांना दडपण येईल असे वातावरण न्यायालयात राहू नये. त्यांना समाधानाची पावती मिळायला हवी, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी माजी मंत्री आ. सुनील केदार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
नेटकऱ्यांनी आधार विरहित भाष्य करू नये
सोशल मीडियावरील कॉमेंटमुळे समाजमन दूषित होते. त्यामुळे वैचारिक स्वातंत्र्य उपभोगताना समाजमनावर काय परिणाम होईल, याची जाण ठेवून नेटकऱ्यांनी आधार विरहित भाष्य करू नये. अभ्यासपूर्ण भाष्य असेल तरच त्यांचे स्वागत होईल, असेही न्यायमूर्ती शुक्रे यांनी सांगितले.