लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्र खगोलीय घटनांवर आधारित आहे आणि टेलिस्कोप विकसीत होण्यापूर्वीपासूनच ब्रह्मांडातील खगोलीय घटनांचा वेध प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी घेतला आहे. त्याचअनुषंगाने सोमवारी १३ जुलै रोजी पूर्व दिशेला क्षितिजावर अद्भूत अंतराळीय घटनेचा साक्षात्कार सर्वसामान्यांना घेता येणार आहे. सूर्य, पृथ्वी आणि गुरू हे तिन्ही ग्रह एका सरळ रेषेत येणार असल्याने सूर्यास्तापासून गुरूचे तेजस्वी दर्शन घडणार आहे.१३ जुलै रोजी गुरू धनू राशीत २८ अंश २२ कला व ११ विकलावर तर त्याच सुमारास सूर्य मिथून राशीत २६ अंश ५५ कला व ४४ विकलावर राहणार आहे. याचा अर्थ पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य तर विरूद्ध बाजूला गुरू अशी स्थिती असणार आहे. त्यामुळे, सूर्यास्ताबरोबरच पूर्व क्षितिजावर गुरूचे दर्शन होईल. सूर्यास्त संध्याकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी होणार आहे. यावेळी गुरू सूर्याच्या अगदी समोर आलेला असल्यामुळे पृथ्वीवरून जो गुरूचा भाग दिसतो, त्यावर सूर्याचा प्रकाश पडेल आणि त्यामुळे गुरू प्रकाशमान व तेजस्वी दिसेल.
गुरू जसजसा वर येईल तसतसा तो अधिक चमकदार होणार आहे. ही ग्रहस्थिती सर्वसामान्यांना सहज डोळ्यांनी अनुभवता येणार असून, टेलिस्कोपचा आधार घेतला तर गुरूवरील आभाळ व गुरूचे चंद्रही बघता येणार आहे. गुरूचे ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे, ज्योतिषशास्त्रज्ञांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. गुरूला देवांचा गुरू म्हटले जाते. त्यामुळे, गुरूचे दर्शन घेणे अत्यंत लाभदायक समजले जाते. ज्यांचा गुरू प्रबळ असेल किंवा ज्यांना गुरूबळ नाही, त्यांनी या घटनेचा साक्षात्कार घेऊन ओम बृं बृहस्पतये नम: हा मंत्र १०८ वेळा जपण्याचे आवाहन प्रख्यात आंतरारष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी केले आहे. ही घटना रात्रभर उघड्या डोळ्यांनी बघता येणार आहे, हे विशेष.