भिवापूर : पेरणीसाठी शेतकऱ्यांनी साेयाबीनचे बियाणे घरचेच वापरावे तसेच पेरणीपूर्वी त्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्यावी व बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी एस. एन. गिरी यांनी केले आहे.
दाेन वर्षापासून साेयाबीन कापणीच्या काळात पाऊस येत असल्याने साेयाबीनच्या उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. खरीप हंगामात बियाण्यांचा तुडवडा निर्माण हाेऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या वतीने ग्राम बीजाेत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती एस. एन. गिरी यांनी दिली. यात स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण बियाण्यांचे उत्पादन करून खरीप हंगामासाठी बियाणे जतन करण्याबाबतची मोहीम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या गेली. शेतकरी अनेकदा बियाण्यांची गुणवत्ता न तपासता बियाण्यांचा वापर करतात. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवते. बियाण्यांच्या उगवणशक्ती तपासणीत १०० बियांपैकी ७० च्यावर बिया अंकुरल्यास ते बियाणे पेरणीयोग्य समजावे. त्याहून कमी असल्यास त्यासाठी कृषी विभागाचे आवश्यक मार्गदर्शन घ्यावे किंवा पेरणी करताना बियाण्यांचे प्रमाण वाढवावे, असे आवाहन मंडळ अधिकारी एस. एन. गिरी यांनी केले आहे.