वेलतूर : कृषी विभागाच्यावतीने तालुक्यात बियाणे उगणवशक्ती तपासणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांना साेयाबीनच्या बियाण्याची उगवणशक्ती घरीच कशी तपासायची याची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली जात आहे.
काेराेना संक्रमणामुळे कृषी विभागाचे कर्मचारी गावागावात जाऊन उपाययाेजनांचे पालन करीत शेतकऱ्यांना याबाबत माहिती देत आहेत. पेरणीसाठी निवडलेल्या बियाण्यातील साेयाबीनचे १०० दाणे घ्यायचे. प्रत्येकी १० दाणे १० ओळींमध्ये भिजलेल्या गाेणपाटामध्ये किमान एक ते दीड इंच अंतरावर ठेवायचे. ते गाेणपाट व्यवस्थित गुंडाळून ठेवायचे. त्यावर राेज पाणी शिंपडावे. पाचव्या दिवशी गाेणपाट उघडून अंकूर माेजावे. यातील ७० दाणे उगवल्यास त्या बियाण्यांची उगवणशक्ती ७० टक्के आहे, असे ग्राह्य धरावे. ७० टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे एकरी ३० किलाे पेरणीसाठी वापरावे. उगवणशक्ती एवढी कमी असेल तेवढे अधिक बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले. यावेळी पेरणीपूर्वी करावयाची बीज प्रक्रियादेखील समजावून सांगण्यात आली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी प्रदीप पोटदुखे, एन. डी. नेहारे, अविनाश दुधबर्वे, प्रीती रामटेके, पूजा गाडगे, एस. एस. मेश्राम उपस्थित होते.