चिंता वाढली : केवळ १५.१४ टक्के पेरण्या नागपूर : जून महिना उलटूनसुद्धा नागपूर विभागात अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही. यामुळे संपूर्ण विभागातील पेरण्या खोळंबल्या असून, आतापर्यंत केवळ १५.१४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांसह कृषी विभागाची चिंता वाढली आहे. यातच मागील आठवडाभरापासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांचाही जीव टांगणीला लागला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात लागवडीखाली एकूण १९ लाख १० हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. मात्र त्यापैकी केवळ २ लाख ८९ हजार २०० हेक्टरवरच पेरणी पूर्ण झाली आहे. शिवाय यात नागपूर जिल्ह्यातील १७ टक्के पेरणीचा वाटा आहे. हवामान विभागाच्या मते, जून महिन्यात नागपूर विभागात सरासरी १६०.६ मिमी. पाऊस पडतो. मात्र यावर्षी केवळ १३२.६ मिमी. (७०.७ टक्के) पाऊस पडला आहे. पावसाची ही टक्केवारी जिल्हानिहाय पाहता नागपूर जिल्ह्यात ५६.३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ८३.३ टक्के, भंडारा ४१.४ टक्के, गोंदिया ४७.६ टक्के, चंद्रपूर ८८.९ टक्के व गडचिरोली जिल्ह्यात ८७ टक्के पाऊस पडला आहे. यामुळे विभागातील वर्धा येथे २७ टक्के आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १८ टक्के पेरण्या आटोपल्या असून, नागपूर जिल्ह्या हा १७ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय भंडारा येथे १ टक्का, गोंदिया ३ टक्के व गडचिरोली जिल्ह्यात ४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यासाठी ४ लाख ८४ हजार ५०६ हेक्टर क्षेत्रावरील पीक लागवडीचे नियोजन केले आहे. त्यापैकी आतापर्यंत ८३ हजार ५९८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याचा तालुकानिहाय विचार करता, नागपूर ग्रामीणमध्ये १८.५० टक्के, कामठी ०.५७ टक्के, हिंगणा २८.५७ टक्के, रामटेक ०० टक्के, पारशिवनी १९.९३ टक्के, मौदा ०.९३ टक्के, काटोल १९.५८ टक्के, नरखेड ५.९१ टक्के, सावनेर ७०.७४ टक्के, कळमेश्वर ३४.७६ टक्के, उमरेड १४.४४ टक्के, भिवापूर १.०५ टक्के व कुही येथे ०.२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. तसेच जिल्ह्यात कापसाचे १ लाख ९६ हजार ९७० हेक्टर अपेक्षित लागवड क्षेत्र असून आतापार्यंत त्यापैकी ६१ हजार ४२८ हेक्टर कापसाची लागवड झाली आहे. शिवाय ८ हजार ४५९ हेक्टरवर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. (प्रतिनिधी)
विभागातील पेरण्या खोळंबल्या!
By admin | Published: July 03, 2016 2:50 AM