नागपूर : घरी कुणीच नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या घरात बेडरुमच्या लोखंडी कपाटात व देवघरात ठेवलेल्या सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल पळविला. ही घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्लॉट नं. ५२, सुर्वे ले-आऊट छोटा ताजबागच्या मागे बुधवारी रात्री दोनच्या दरम्यान घडली.
जयश्री भास्कर इंगळे (४६) रा. सुर्वे ले-आऊट यांचा लहान भाऊ सुमित इंगळे हा मुंबईतील बदलापूर येथे राहतो. त्यामुळे त्यांच्या घरातील सर्वजण घराला कुलूप लावून तसेच मुख्य गेट बंद करून मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर त्यांचा भाऊ सुमितला मोबाईलमध्ये जयश्री यांच्या सीसीटीव्ही कॅमेराची दिशा बदललेली दिसली. घरी चोरी झाल्याची शंका आल्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना फोन करून माहिती दिली. शेजाऱ्यांनी तपासणी केली असता गेटचे कुलूप तुटलेले दिसले. मुंबईवरून परत आल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता बेडरुममधील लोखंडी कपाटातील व देवघरातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याची समजले. याबाबत त्यांनी सक्करदरा पोलिसात तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड यांनी आपल्या पथकासह आरोपीचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता त्यात दोन संशयित इसम मोटारसायकलवर फिरताना दिसले. गुप्त बातमीदाराकडून माहिती घेतली असता त्याने आरोपींची माहिती दिली. त्यावरून आरोपींचा पाठलाग केला असता शुभम ऊर्फ अप्या प्रकाश मानके (२६) रा. जयंती मैदान, रामबाग, सुनील उर्फ दद्या रामपाल कश्यप (२२) रा. रामबाग, आदित्य नत्थु पेंदाम (२३), करण कैलाश शंभरकर (२०) सर्व रा. रामबाग यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे, सहायक पोलीस आयुक्त नीलेश पालवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, गुन्हे पोलिस निरीक्षक चंद्रकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड, हवालदार विजय गुरपुडे, संदीप बोरसरे, नितीन राऊत, बाळु गिरी, हेमंत उईके, नीलेश शेंदर यांनी पार पाडली.
.................