नागपूर : हरियाणा सोबतच महाराष्ट्राच्या निवडणुका होतात. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे अध:पतन झाले. आताही राज्यात महाविकास आघाडीचे वातावण आहे. त्यामुळेच सरकार निवडणुका पुढे ढकलत असून राज्य अस्थिर करीत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
वडेट्टीवार शुक्रवारी रात्री नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जात आहेत. आता विधानसभा निवडणूकीआधी लाडकी बहिण सारख्या योजना आणून पत सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.
नाशिकच्या घटनेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आशिष शेलार हे चिथावणीखोर वक्तव्य करीत आहेत. भावना व्यक्त कराव्या पण चिथावणीखोर वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचे करत आहे. सरकार पुरस्कृत घटना दिसत आहे. धर्म धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. दंगली घडवण्याचे षडयंत्र घडवले जात आहे. आघाडीच्या बाजूने वातावरण आहे म्हणून सरकार घाबरले आहे. राज्यात अस्थिरता निर्माण करून निवडणूक जिंकण्याचे कारस्थान सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.