नागपूर : भंडारा जिल्ह्यात असाहाय्य महिलेवर सामूहिक अत्याचार करून विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकून देणाऱ्या महिलेचा जीव वाचविण्यासाठी मेडिकल शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तिला संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेत आहेत. यामुळे पीडितेला केवळ अतिमहत्त्वाचीच आणि एकावेळी एकाच महिलेला भेटू देण्याचा निर्णय मेडिकलने घेतला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील ३५ वर्षीय महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराचे प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारे आहे. मेडिकलच्या स्त्रीरोग विभागातील वॉर्डात पीडितावर उपचार सुरू आहेत. शनिवारी पीडिता प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ आपल्या चार-पाच कार्यकर्त्यांसह मेडिकलमध्ये धडकल्या. तर, रविवारी शिवसेनेच्या आ. डॉ. मनीषा कायंदे, सुषमा अंधारे व प्रवक्त्या संजना घाडी भेटीसाठी आल्या. राजकीय लोकांची गर्दी पाहता अतिमहत्त्वाचा व्यक्तीलाच भेटण्याचा निर्णय मेडिकल प्रशासनाने घेतला. यामुळे चित्रा वाघ यांना एकटीलाच भेटण्याची परवानगी देऊन इतरांना वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात बसून ठेवले. आ. डॉ. कायंदे, अंधारे व घाडी यांनाही वॉर्डाबाहेर थांबवून एकेकटीलाच भेटण्याची परवानगी दिली. नंतर डॉ. कायंदे व अंधारे यांनी बाहेर पत्रपरिषद घेऊन प्रशासनावर व भाजपवर राग व्यक्त केला.
-पीडितेची स्थिती पाहता भेटण्यावर निर्बंध
मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल राजकोंडावार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, पीडितेची प्रकृती पाहता तिला भेटण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. केवळ अतिमहत्त्वाच्याच व्यक्तींना भेटू दिले जात आहे. तेही महिला आणि एकेकटीलाच आत जाण्याची परवानगी आहे. पीडितेला लागणाऱ्या सर्व आवश्यक औषधी उपलब्ध आहेत. तिच्यावर स्त्रीरोगतज्ज्ञांसह शल्य चिकित्सक, मेडिसिनचे डॉक्टर व मानसोपचारतज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत.