नागपूर : जिवंतपणी गरिबीचे चटके अन् अनेकांकडून उपेक्षा, अवहेलना सहन करणाऱ्या 'त्या' बिचाऱ्यांना अत्यंत वेदनादायी मृत्यू मिळाला. मृत्यूनंतर माणसाची सर्व कटकटीपासून, मान-अपमानापासून सुटका होते, असे म्हणतात. मात्र, भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 'त्या' पाच जणींना मृत्युनंतरही उपेक्षा अन् अवहेलनाच सहन करावी लागली. नियती किती भयानक पद्धतीने सूड उगविते, त्याचा आज प्रत्यय आला अन् माणसंच नव्हे तर निसर्गही गलबलला, हमसून हमसून रडला.
धामना लिंगा या छोट्याशा खेडेगावातील प्राची श्रीकांत फलके (१९), वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०), प्रांजली किसनाजी मोंदरे (वय २२), मोनाली शंकरराव अलोने (२५) या चार तरुणी आणि शीतल आशिष चटप (३०) ही एका चिमुकलीची आई ! पाचही जणी गरिबीचा शाप घेऊन जन्माला आल्या. मात्र, त्यांनी परिस्थितीशी संघर्ष करून जगण्याचा मार्ग प्रशस्त करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यानंतर त्यांनी स्वत:सोबतच कुटुंबियांचेही जगणे सुसह्य व्हावे म्हणून मिळेल ते कष्ट करण्याची तयारी चालविली. दरदिवशी त्या परिस्थितीचे चटके आणि उपेक्षा, अवहेलनाही सहन करीत होत्या. गुरुवारी, १३ जूनला भीषण स्फोटाने त्यांच्या शरिराची अवस्था फारच वाईट केली.
उपचार मिळेल म्हणून मरणयातना सहन करीत त्या खूप वेळपर्यंत प्रतिक्षा करीत होत्या. मात्र, त्यांना उपेक्षाच वाट्याला आली. शेवटी त्यांनी जीव सोडला. मृत्युनंतर साऱ्याच दु:ख, वेदनातून सुटका होत असल्याचे लोक म्हणतात. मात्र, कसले काय. शुक्रवारी १४ जूनला प्राची, वैशाली, प्रांजली, मोनाली आणि शितल यांचे मृतदेह दुपारी २.३० च्या सुमारास गावाच्या वेशिवर पोहचले. तोपर्यंत स्फोटाची घटना घडून सुमारे २६ तासांचा वेळ झाला होता. मृतदेहाची स्थिती बघता त्यांच्यावर तातडीने अंत्यसंस्कार होणे अपेक्षित होते. मात्र, गुरुवारी दुपारपासून शुक्रवार दुपारपर्यंत कंपनी प्रशासन आणि शासकीय यंत्रणांची एकूणच तटस्थ भूमीका लक्षात घेऊन गावकऱ्यांना भलतीच शंका आली. एकदा अंत्यसंस्कार केले की प्रशासनातील मंडळी मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार नाही, त्यांना हेलपाटे मारायला लावले जाईल, असे त्यांना वाटले. त्यामुळे आधी मदतीचा धनादेश द्या, नंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करू, अशी भूमीका शोकविव्हळ गावकऱ्यांनी घेतली. त्यावेळीपर्यंत नेहमीसारखी प्रशासकीय यंत्रणा मख्ख होती. ही मागणी पुढे आल्याने त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. २.३० वाजतापासून वेगवेगळे कारण सांगून मदतीचे धनादेश आता येईल, नंतर येईल, असे सांगितले जाऊ लागले. नागपूरहून धनादेश येणार म्हणजे, जास्तीत जास्त अर्धा किंवा एक तास लागेल, असे वाटत होते.
परंतू, अडीच तीन तास होऊनही मदतीचे धनादेश पोहचलेच नव्हते. ईकडे नागरिकांच्या, बायाबापड्यांच्या भावनांचे आभाळ भरून आले होते. मृतदेह किती वेळ तसेच ताटकळत ठेवायचे, असे विचारत अनेक जण अश्रूंना वाट मोकळी करून देत होते. तिकडे तरुण मंडळींचे पेशन्स संपल्याने ते रस्ता रोको, घोषणाबाजी करून आक्रमक होत होते. मात्र, निगरगट्ट प्रशासकीय यंत्रणा वेळ काढण्यातच जास्त स्वारस्य दाखवित होती. कोणत्याही संवेदनशिल मनात उद्रेक निर्माण करणाराच हा प्रकार होता. कदाचित निसर्गाला त्या बिचाऱ्या प्राची, वैशाली, प्रांजली, मोनाली आणि शितल यांची मृत्युनंतरही होणारी अवहेलना सहन झाली नसावी. त्यामुळे तोही गललबला असावा. म्हणूनच की काय, अचानक टपोऱ्या थेंबाच्या पावसाला सुरुवात झाली. थोड्या-थोड्या वेळाने हुंदके भरून यावे अन् अश्रूंचा बांध फुटावा, तसा पाऊस येऊ लागला. विशेष म्हणजे, सर्वत्र नव्हे तर धामन्याच्या आजुबाजूच्या परिसरातच हा पाऊस पडला. त्या बिचाऱ्यांच्या यातनांवर निसर्ग हमसून हमसून रडल्यासारखाच हा प्रकार होता.
शोकविव्हळ मनावर फुंकर
सायंकाळी साडेसहाच्या सुुमारास भर पावसात मृतांच्या कुटुंबियांसाठी घटनास्थळी एका अधिकाऱ्याच्या वाहनात मदतीचे धनादेश तयार करण्यात आले. त्यांच्या शोकविव्हळ मनावर मदतीची फूंकर घालण्यात आली. त्यानंतर जड अंतकरणाने प्राची, वैशाली, प्रांजली, मोनाली आणि शितल यांना निरोप देण्यात आला.