लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकांचे गळे कापून निरपराधांच्या जिवावर उठू पाहणाऱ्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी कारवाई केली. साैरभ शाम भोयर (वय २०, रा. वकीलपेठ, ईमामवाडा), संदीप खेमराज वाघाडे (२२, रा. दिघोरी) आणि जितेंद्र शाहू (जितेंद्र पतंग स्टोअर्सचा मालक, जुनी शुक्रवारी) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी घातक मांजाच्या १८ चक्र्या जप्त केल्या.
राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही गेल्या आठवड्यात मनाई आदेश काढून नायलॉन मांजा विकणे, बाळगणे आणि साठवणे यावर बंदी घातली आहे. मांजाची साठवणूक किंवा विक्री करताना कुणी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा ईशाराही दिला आहे. असे असताना बेलतरोडी आरोपी भोयर, वाघाडे आणि शाहू मांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे परिमंडळ चारचे उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मराठे तसेच बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली उपिनरीक्षक विकास मनपिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी आरोपींकडे छापा टाकला. त्यांच्याकडे ९ हजार रुपये किमतीच्या १८ मांजाच्याचक्री आढळल्या. त्या जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
----
कडक कारवाई व्हावी
उपरोक्त आरोपी मांजा विक्रीच्या गोरखधंद्यात अनेक दिवसांपासून सक्रिय आहेत. मांजामुळे दरवर्षी अनेक निरपराधांचे गळे कापले जातात. अनेकांचे बळी जातात. मात्र, पैशांसाठी हपापलेल्यांना त्याची खंत वाटत नाही. मांजा आणि पतंगीच्या खेळात कुणाचाही गळा कापला जाऊ नये किंवा कुठेही असे जीवघेणे प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी मांजा विकणे, साठवणे आणि वापरण्यावर बंदी घालणारा आदेश काढला आहे. मात्र, अनेक पतंगबाज खुलेआम घातक मांजा वापरताना दिसतात. या पतंगबाजांवरही कडक कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
----
पोलिसांचे आवाहन
शासनाने नायलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगांवर बंदी घातली आहे. त्यामुळे मांजा तसेच प्लास्टिक पतंग विकणे, बाळगणे, साठवणे गुन्हा आहे. हा गुन्हा करताना कुणी आढळल्यास १०० नंबर किंवा बेलतरोडी पोलीस ठाण्यात ०७१०३२९७६१७ क्रमांकावर अथवा आपल्या भागातील पोलीस ठाण्यात संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
---