नागपूर : शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त करण्यात आलेल्या हवालाचे सव्वाचार कोटी रुपये पोलिसांनी सरकारी तिजोरीत (कोषागारात) जमा केले आहे. पोलिसांच्या या भूमीकेमुळे हवाला व्यावसायिक बुचकळ्यात पडले आहेत.
हवाला व्यावसायिकांचे मोठे सेंटर असलेल्या नागपुरात गोंदियातील हवाला व्यावसायिक कोट्यवधींची रोकड घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना शुक्रवारी दुपारी मिळाली होती. माहिती पक्की असल्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंभारपुऱ्यात इंद्रायणी साडीच्या मागे राहणाऱ्या नेहाल सुरेश वडालिया (वय ३८, रा. कोतवाली) याच्या सदनिकेत पोलिसांनी छापा घातला. तेथे वडालियासोबत वर्धमान विलासभाई पच्चीकार (वय ४५) आणि शिवकुमार हरीशचंद दिवानीवाल (वय ५२, दोघेही रा. गोंदिया) हे कोट्यवधींच्या नोटा मोजताना आढळले. पोलिसांच्या प्राथमिक चाैकशीत हे तिघेही हवाला व्यावसायिक असल्याचे उघड झाल्याने आणि त्यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी ही रोकड हवालाची असल्याचा अंदाज बांधला.
त्यानुसार, ही ४ कोटी, २० लाखांची रोकड जप्त करण्यात आली. दरम्यान, शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंत या संबंधाने पोलिसांनी उपरोक्त आरोपींची चाैकशी केली. त्यात या रकमेचे कनेक्शन गोंदियासह जबलपूरमध्येही असल्याचे उघड झाले. पोलिसांनी वडालिया, पच्चीकार आणि दिवानीवाल या तिघांना नोटीस देऊन बोलावले तेव्हा चाैकशीसाठी हजर राहण्याची सूचना करीत सोडून दिले. आज ही रोकड सरकारी कोषागारात जमा करण्यात आली.
कोण करणार रकमेवर दावा ?
यापूर्वीही शहरात अनेकदा हवालाची रोकड पोलिसांनी जप्त केली. प्रत्येक वेळी पोलीस चाैकशी केल्यानंतर हवालाची रोकड प्राप्तीकर खात्याच्या हवाली करतात. यावेळी मात्र पोलिसांनी कारवाईची पद्धत बदलली. त्यांनी प्राप्तीकर खात्याला कारवाईची सूचना दिली मात्र रक्कम सरकारी कोषागारात जमा केली. त्यामुळे आता या रकमेवर कोण कोण, कशा पद्धतीने दावा करण्यासाठी पुढे येतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गजानन राजमाने स्वताच या तपासाची सूत्रे सांभाळत असल्याने अनेकांची गोची झाली आहे.
-----