लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ भारत अभियान ग्रामीणअंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ५० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये स्वच्छता अभियानात विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गावातील रोगराई दूर करण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२०-२१ च्या वार्षिक कृती आराखड्यात जिल्ह्यातील एकूण ७६८ ग्रामपंचायतींमधील ५० गावांमध्ये शासनाच्या नवीन धोरणानुसार सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या गावांची निवडही शासनाकडून करण्यात आली असून, या उपक्रमाअंतर्गत पाच हजारावरील लोकसंख्या असलेल्या गावात घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ६० रुपये, तर सांडपाण्यासाठी २८० रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच पाच हजारावरील लोकसंख्येच्या गावामध्ये घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ४५ रुपये, तर सांडपाण्यासाठी ६६० रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) अनिल किटे यांनी पुढाकार घेतला आहे.
ही कामे होणार...
सांडपाणी व्यवस्थापनात सार्वजनिक व कुटुंबस्तरावर शोषखड्डा निर्मिती, स्थिरीकरण तळे, नाले व बंदिस्त गटारी, टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर करणे आदी विषय असणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनात सार्वजनिक कंपोष्ट निर्मिती, बॅटरीवरील व पायडेलची ट्रॉय सायकल वापरून कचरा गोळा करणे, प्लास्टिक कचरा साठवण्यासाठी शेड बांधणे, कुटुंबासाठी कचरा कुंड्या देणे, सार्वजनिक कचरा कुंड्या बसवणे, कुटुंबस्तरावर कंपोष्ट खत निर्मिती करणे, गावस्तरीय बायोगॅस प्रकल्प उभारणे, कचरा वर्गीकरण, साठवण व कंपोष्ट प्रकल्प व्यवस्थापन करणे आदी कामे आहेत.
या प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे यांनी सांगितले.
निवड झालेली गावे...
नागपूर : सोनेगाव निपानी, चिकना, लिंगा, बाजारगाव
भिवापूर: नक्क्षी, नांद, तास, बेसूर
हिंगणा : अडेगाव, कोतेवाडा, मंगरुळ व सुकळी
कळमेश्वर : बोरगाव, घोराड, लिंगा, पारडी (देश.)
काटोल : कचारी सावंगा, डिग्रस, रिधोरा, सोनोली
कुही : पचखेडी, तरण, वाग, मौद्यातील धरमपूर, कोदामेंढी, माथनी, मोहाडी
कामठी : बिना, गडा, खापा, नेरी
नरखेड : लोहारीसावंगा, रोहणा, रामधी
पारशिवनी : जुनी कामठी, नयकुंड, पालोरा, तामसवाडी
सावनेर : चिचोली (खा.), चनकापूर, इसापूर व वाकोडी
रामटेक : मांदरी, पंचला, पिंडकापार
उमरेड : सिर्सी, वायगाव, हिवरा व पिपरी