नागपूर :नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाव्दारे मौजा तरोडी (खूर्द), मौजा वांजरी व मौजा वाठोडा येथील रिक्त ९९७ घरकुलांसाठी बुधवारी २२ नोव्हेंबरला महानगर आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी यांच्याहस्ते प्राधिकरणाच्या सदर येथील कार्यालयात मौजा तरोडी (खुर्द), मौजा वाळीडा व मौजा वांजरी या प्रकल्पातील उर्वरित ९९७ सदनिकेची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. ५७१४ अर्जधारकांतून या लाभार्थींची निवड करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणातर्फे देण्यात आली.
सोडतीमधील विजेत्या लाभार्थ्यांची यादी https://nmrda.neml.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये ९९७ लाभार्थींचा समावेश आहे. मौजा भिलगाव येथील सदनिकांचे बांधकाम प्रगती पथावर असुन बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे सदनिकांची सोडत बांधकाम पूर्ण झाल्यावर करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या पत्यावर वाटपप्रस्ताव पत्र व इरादापत्र लवकरच निर्गमित करण्यात येतील. लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनाचे निकष पूर्ण करणारे दस्ताऐवज प्रकल्प विभाग, ना.म.प्र.वि.प्रा. गोकुलपेठ कार्यालय येथे सादर करावे, सदनिकेच्या रक्कमेचा भरणा विहित मुदतीत करून सदनिकेचा ताबा घ्यावा, असे आवाहन महानगर आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केलेले आहे.