नीलेश देशपांडे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) यांच्या ॲथ्लेटिक्स केंद्रामध्ये सायली वाघमारे यांची प्रशिक्षकपदी निवड करण्याचा निर्णय चुकीचा आहे, असा आरोप ज्योती चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी यासंदर्भात साई संचालकांना पत्र लिहिले आहे.
प्रशिक्षक पदाकरिता या दोघींसह गजानन ठाकरे यांनी अर्ज दाखल केला होता. निवड समितीने वाघमारे यांना या जबाबदारीसाठी योग्य ठरवले. निवड समितीमध्ये नागपूर विद्यापीठाच्या दोन तर, साईच्या एक प्रतिनिधीचा समावेश होता. या समितीने चव्हाण यांच्या पात्रतेकडे दुर्लक्ष केले, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. चव्हाण यांनी २०१९ मध्ये इटली येथे आयोजित ३० व्या उन्हाळी विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांना आंतरराष्ट्रीयस्तरावर खेळण्याचा १२ वर्षांचा अनुभव आहे. तसेच, त्यांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तीन सुवर्ण पदके मिळविली आहेत. त्या भोपाळ येथील साई केंद्रात गेल्या पाच वर्षांपासून अनुभवी प्रशिक्षक हुगो वॅन डेन ब्रोएक, प्रतिभा टोप्पो व सुरेंद्र पॉल यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहेत. असे असताना प्रशिक्षक पदासाठी अपात्र ठरवून आपल्यावर अन्याय झाला आहे, असे चव्हाण यांनी अर्जात म्हटले आहे.
चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना वाघमारे यांच्यासाेबत वैर नसल्याचे स्पष्ट करून निवड समितीने माझा आंतरराष्ट्रीय अनुभव विचारात घ्यायला हवा होता, असे मत व्यक्त केले. वाघमारे यांच्याकडे माझ्याएवढा दीर्घ अनुभव नाही. वाघमारे यांच्यापेक्षा माझ्याकडे अधिक सुवर्ण पदके आहेत. परंतु, दीर्घकाळापासून भोपाळमध्ये असल्यामुळे स्थानिक पाठिंबा नाही व स्थानिक संपर्कही तुटला आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदी निवड केली गेली नसावी, असे चव्हाण यांनी सांगितले. यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांना विचारणा केली असता, त्यांनी प्रशिक्षकाची निवड करताना कामगिरीपेक्षा मुलाखतीला जास्त महत्त्व देण्यात आले, असे उत्तर दिल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.
------------
प्रशिक्षक पदाकरिता वाघमारे योग्य
ॲथ्लेटिक्समध्ये चव्हाण यांनी वाघमारे यांच्यापेक्षा अधिक यश मिळविले आहे. परंतु, प्रशिक्षक पदाकरिता वाघमारे याच योग्य असल्याचे निवड समितीला आढळून आले. प्रशिक्षणाची पद्धत, शैक्षणिक पार्श्वभूमी व सकारात्मक भूमिका यामध्ये वाघमारे या चव्हाण यांच्यापेक्षा सरस आहेत.
----- डॉ. शरद सूर्यवंशी.