मान्यवरांचे प्रतिपादन : केदारनाथ सिंग यांच्या साहित्यावर चर्चासत्रनागपूर : केदारनाथ सिंग यांच्यात अनेक वैशिष्ट्य असल्यामुळे त्यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी घोषणा झाली. त्यांनी आत्मसंघर्ष करून लेखन केले. आत्मसंघर्ष कवीला नव्या दिशेने घेऊन जातो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.हिंदीतील ज्येष्ठ कवी केदारनाथ सिंग यांना ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा झाल्याबद्दल प्रगतिशील लेखक संघाच्यावतीने गोकुळपेठेतील राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. कविता शनवारे होत्या. चर्चासत्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख प्रा. वीणा दाढे, कवी वसंत त्रिपाठी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना प्रा. वीणा दाढे म्हणाल्या, हिंदीतील कवी, साहित्यिकांचा गौरव ते मृत्यू पावल्यानंतर होतो. त्यामुळे केदारनाथ सिंग हे भाग्यवान आहेत. जिवंत असतानाच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. केदारनाथ सिंग यांचे विचार सामान्य व्यक्तीशी निगडित आहेत. त्यांनी आत्मसंघर्ष केल्यामुळे त्यांच्या कवितांना धार प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. कवी वसंत त्रिपाठी म्हणाले, केदारनाथ सिंग यांनी समकालीन कवितांच्या सीमेबाहेर जाऊन लेखन केले नाही. त्यांचे संग्रह ६ ते ८ वर्षांच्या अंतराने प्रकाशित झाले. नव्या कवींचे ते आवडीचे कवी आहेत. त्यांच्या कवितातील दृश्य मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या कविता रसिकाला मोहून टाकतात. कविता शनवारे यांनी केदारनाथ सिंग यांनी समर्पित होऊन लेखन केल्याची माहिती दिली. त्यांच्या कवितेतून वातावरणनिर्मिती होत असून, त्यांच्या कविता जीवनाला वाळवंट होऊ देत नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. संचालन प्रसेनजित गायकवाड यांनी केले. चर्चासत्रानंतर हिंदीतील ज्येष्ठ कथाकार मधुकर सिंग यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला प्रगतिशील लेखक संघाचे राज्य सचिव श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आत्मसंघर्ष कवीला नव्या दिशेने घेऊन जातो
By admin | Published: July 27, 2014 1:23 AM