लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात बचत गट आणि महिला अधिकारांची योग्य सांगड घातली गेली असून, त्यायोगे महिला सक्षमीकरणाचे महत्त्वाचे कार्य घडल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. प्रा.डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांच्या ‘स्वयंसहाय्यता चळवळीतील महिलांची वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन गोऱ्हे यांच्या हस्ते आभासी माध्यमाद्वारे करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
संविधान फाऊंडेशन आणि पुणे येथील स्वयंदीप प्रकाशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’च्या शुभदा देशमुख उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या अभ्यासावर डॉ. मेश्राम यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
बचत गटाच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होत आहेत. त्याचबरोबर या बचत गटाचा गैरफायदा घेऊन महिलांच्या फसवणुकीचे प्रकारही पुढे येत आहेत. त्याकडेही विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील महिला बचत गटाचे हे संशोधन संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचे संशोधन आहे. विशेषतः ३८ ते ५३ वयोगटातील महिलांचा सर्वाधिक सहभाग हा निष्कर्ष महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही लागू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे युवतींचा सहभाग वाढला तरच भविष्यात ही चळवळ अधिक सक्षमरीत्या काम करेल. लोकशाहीचे मूल्य बचत गटाच्या माध्यमातून पोहोचत आहे. मात्र लोकशाही कुटुंबांनी अंगिकारली का, हेही आता तपासायला हवे. केवळ संविधानाच्या प्रती सर्वांपर्यंत पोहोचविण्याऐवजी, संविधानाचा अर्थ सर्वांपर्यंत पोहोचला तरच लोकशाही अधिक सक्षम होईल, असे गोऱ्हे यांवेळी म्हणाल्या. गडचिरोलीतील बचत गटाप्रमाणे किल्लारी-लातूर या भागात भूकंपानंतर बचत गटांनी केलेले कार्य आणि त्यातून महिलांची झालेली प्रगती यावरही अभ्यासपूर्ण संशोधन व्हावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले. संचालन पुण्याच्या आयकर विभागाच्या उपायुक्त क्रांती खोब्रागडे यांनी केले तर, आभार डॉ. बबन जोगदंड यांनी मानले.
................