नागपूर : भारतीय शिक्षणप्रणालीमध्ये आत्मनिर्भरतेवर भर देण्यात आला आहे. मात्र, पश्चिमात्य पद्धतीचा अवलंब केल्याने आपल्या आधुनिक शिक्षणव्यवस्थेत यावर पुरेपूर विचार केला गेला नाही. परिणामी, आपल्या देशात शिक्षित बेरोजगारांची मोठी फौज तयार झाली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या समस्येचे समाधान शोधत कौशल्यपूरक शिक्षणाला प्रोत्साहित करीत असल्याचे प्रतिपादन आत्मनिर्भर भारत अभियानाचे मध्य प्रांत संयोजक तथा शिक्षणतज्ज्ञ ओमप्रकाश शर्मा यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागात आयोजित आत्मनिर्भर भारताची संकल्पना या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. देशाला विकसित राष्ट्र बनविण्याकरिता युवकांना आत्मनिर्भर होण्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. स्वयंरोजगाराकडे वळविणारे शिक्षण युवकांना मिळणे गरजेचे आहे. कारण, आत्मनिर्भरता हीच देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करेल, असे शर्मा म्हणाले. हिंदी विभागप्रमुख डॉ. मनोज पांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आत्मनिर्भरता व्यक्तिमत्त्व विकासाची प्रथम पायरी असल्याचे डॉ. पांडे म्हणाले. संचालन डॉ. सुमित सिंह यांनी केले, तर आभार सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष गिऱ्हे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. लखेश्वर चंद्रवंशी, डॉ. कुंजन लाल लिल्हारे, प्रा. जागृती सिंह, प्रा. दिशांत पाटिल, प्रा. रूपाली हिवसे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.