बेला : मित्रासोबत सहलीसाठी आलेल्या एका तरुणाचा सेल्फी घेताना बुडून मृत्यू झाला. ही घटना वडगाव जलाशयाच्या उजवा कालवा परिसरात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. रविशंकर वसंत पालीवाल (२७, रा. फ्रेंच कॉलनी, आदिवासीनगर, नागपूर) असे मृताचे नाव आहे. रविशंकर हा आपल्या चार मित्रांसह रामा डॅम (वडगाव जलाशय) येथे फिरायला आला होता. दरम्यान तो सेल्फी काढण्यासाठी गेट क्रमांक २१ च्या उजव्या कालव्याच्या स्टीलिंग बेसीन (बकेट) जवळील रोलिंगवर चढला. सेल्फी काढण्याच्या नादात त्याचा मोबाईल हातून निसटला आणि त्याचाही तोल गेल्याने आठ फुट खोल असलेल्या बकेटमध्ये बुडाला. त्यातच रविशंकरचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेल्याचे ठाणेदार अरुण गुरनुले पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी नागपूर मेडिकल रुग्णालयात पाठविला. मृत रविशंकर हा बुटीबोरीतील इंडोरामा कंपनीत सुपरवायजर पदावर कार्यरत होता. त्याचे लग्न जुळले होते. नुकताच साखरपुडाही झाला होता, अशी कुजबूज घटनास्थळी सुरू होती. रामा डॅम परिसरात प्रत्येक वर्षी अशा दुर्दैवी घटना घडतात. परंतु याकडे शासन व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षच होत आहे. याप्रकरणी बेला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला असून तपास ठाणेदार अरुण गुरनुले करीत आहेत. (वार्ताहर)
सेल्फीने घेतला तरुणाचा जीव
By admin | Published: January 19, 2017 2:27 AM