लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साफसफाई आणि सॅनिटाईज्ड करण्यासाठी कॉटन मार्केट ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यावर उपाय म्हणून आयुक्तांनी उत्पादक शेतकऱ्यांना शहराबाहेर आणि मोहल्ल्यात जाऊन गर्दी होऊ न देता भाजी विक्रीला परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारी भाजी विक्रेत्यांनी मोहल्ल्यात जाऊन तसेच रस्त्याच्या कडेला दुकाने लावून भाज्यांची विक्री केली. त्यामुळे नागरिकांना भाज्यांची टंचाई जाणवली नाही. आवक जास्त असल्याने भावही आटोक्यात होते.आयुक्तांच्या निर्देशानुसार शहराबाहेरील जवळपास तीन ते चार विक्रेत्यांनी मनपाकडून पासेस घेतल्याची माहिती आहे. याशिवाय काहींनी बाजारात दुकाने लावली. लोकांनीही मोठ्या प्रमाणात भाज्यांची खरेदी केली. मौदा आणि लगतच्या गावातील शेतकऱ्यांनी पारडी भागात, तर उमरेड रोडवरील गावातील शेतकऱ्यांनी दिघोरी भागात भाज्यांची दुकाने थाटली. त्यामुळे शहरात भाज्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसली नाही. कॉटन मार्केटमध्ये शनिवार आणि रविवारी हजारो ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. कलम १४४ चे उल्लंघन झाल्यानंतर मनपा आयुक्तांनी ३१ मार्चपर्यंत कॉटन मार्केटमधील दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले. याची माहिती शेतकºयांना न मिळाल्याने शहराबाहेरील शेतकºयांनी कॉटन मार्केटमध्ये गाड्या भरून भाजीपाला आणला होता.मौदा भागातील शेतकरी दिनकर जीवतोडे यांनी सक्करदरा भागात भाजीचे दुकान लावले. ते म्हणाले, मध्यंतरी आलेल्या पावसामुळे टमाटर, हिरवी मिरची, वांगे, कोथिंबीर आणि अन्य भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आले आहे. माल काढला नाही तर शेतातच खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात विकण्याची तयारी आहे. शेतातून दररोज माल काढून बाजारात आणावा लागत आहे. कॉटन मार्केट आणि कळमना भाजीबाजार बंद असल्याने खुल्या बाजारात विक्री करीत आहे. मंगळवारी कळमना बाजारपेठ खुली होणार असल्याने तिथे माल विक्रीस नेणार आहे.कळमना भाजीबाजार आजपासून सुरू होणारकळमना भाजीबाजार मंगळवारपासून सुरू होणार असल्याने ग्राहकांची गर्दी होणार आहे. शहरातीन सर्वच विक्रेते या बाजारात हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर कसे नियंत्रण मिळवायचे, हे प्रशासनापुढे मोठे आव्हान ठरणार आहे. किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांना मर्यादित संख्येत आत सोडावे लागेल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांनीही त्याकरिता तयारी चालविली आहे. यानंतरही विक्रेत्यांना कलम १४४ चे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
विक्रेत्यांची नागपुरातील मोहल्ल्यात फिरून भाज्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 8:48 PM
सोमवारी भाजी विक्रेत्यांनी मोहल्ल्यात जाऊन तसेच रस्त्याच्या कडेला दुकाने लावून भाज्यांची विक्री केली. त्यामुळे नागरिकांना भाज्यांची टंचाई जाणवली नाही.
ठळक मुद्देरस्त्याच्या कडेला दुकाने : मनपातर्फे पासेसचे वितरण