नागपूर : ७० रुपये किलोच्या शेंगदाण्यावर प्रक्रिया करून त्याला पिस्ताच्या नावाखाली अकराशे रुपये किलोच्या दराने विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. एका वाहनचालकाला संशयावरून अटक केल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी कारखान्यावर धाड टाकून एकूण १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बनावट पिस्त्याचा शहरातील अनेक मिठाई कारखान्यांना पुरवठा व्हायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
परिमंडळ तीनच्या उपायुक्तांचे पथक पेट्रोलिंग करत असताना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एम्प्रेस मॉलजवळ एमएच४९-बीए-७३६३ या वाहनाने जाणाऱ्या मनोज नंदनवार (५०, लालगंज) या इसमाला संशयावरून थांबविण्यात आले. त्याच्याजवळील पोत्यामध्ये शेंगदाण्यावर प्रक्रिया करून त्याला पिस्त्याचे रूप दिलेले होते. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलिसांनी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना बोलविले व मालाची पाहणी केली असता १२० किलो भेसळयुक्त पिस्ता निघाला. त्याची विक्री अकराशे रुपये किलोने होत होती. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने दिलीप पौनीकर (५०, गोळीबार चौक) याच्याकडून माल आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता तेथे भेसळयुक्त पिस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. त्याच्याकडून सात लाख रुपयांचा भेसळयुक्त पिस्ता, दोन लाखांचे शेंगदाणे व यंत्र असा १० लाख २६ हजारांचा माल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी १२ लाख २३ हजारांचा माल जप्त केला. जितेश आरवेल्ली, विनोद गवई, आशीष अंबादे, राजेश बेंडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अनेक शहरांत विक्री
पौनीकरकडून मोठ्या प्रमाणात ही भेसळ करण्यात येत होती. बाजारातून शेंगदाणे घेऊन त्यांना तो उकडायचा. त्याला वाळविल्यावर यंत्राच्या सहाय्याने कापणी करून परत वाळवून पिस्त्याचे रूप देण्यात येत होते. नागपूर शहर तसेच आजूबाजूच्या मोठ्या शहरात तो माल विक्री करायचा. तसेच शहरातील सोनपापडी बनविणारे काही कारखाने व मिठाई दुकानात माल पुरवत असल्याची त्याने कबुली दिली.