लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिवसेनेची नागपूर शहराची कार्यकारिणी जाहीर झाली. कार्यकारिणीत काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या नेत्यांना महत्त्वाची पदे सोपविण्यात आली आहेत. काँग्रेसमधून सेनेत आलेले प्रमोद मानमोडे यांच्याकडे प्रभारी महानगर प्रमुख तर शिवसेनेत नुकतेच दाखल झालेले काँग्रेसचेच माजी नगरसेवक दीपक कापसे यांची शहर प्रमुखपदी वर्णी लागली आहे. येत्या काळात काँग्रेस फोडून सेना बळकट करण्याचा गेम प्लॅन या नव्या कार्यकारिणीवरून दिसून येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर शहरातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने यादी प्रसिद्ध केली. नागपूर शहरासाठी आता जिल्हा प्रमुखऐवजी महानगर प्रमुख हे पद राहणार आहे. दोन शहर प्रमुख नेमत त्यांच्यावर प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युना सेनेत चमक दाखविणारे नितीन तिवारी यांना शहर प्रमुखपदी एकप्रकारे प्रमोशन मिळाले आहे. यापूर्वी जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणारे माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, सतीश हरडे व माजी महापौरपद भूषविलेले किशोर कुमेरिया यांची सहसंपर्क प्रमुखपदी नेमणूक करून बोळवण करण्यात आली आहे. यापूर्वी संपर्क प्रमुख हे नागपूर बाहेरचे असायचे, त्यामुळे सहसंपर्क प्रमुख यांना विशेष महत्त्व असायचे. मात्र, यावेळी संपर्क प्रमुख हेच स्थानिक असल्यामुळे सहसंपर्क प्रमुख हे नामधारी ठरण्याची शक्यता आहे. माजी शहर प्रमुख सूरज गोजे, राजेश तुमसरे यांनाही महत्त्वाच्या पदावर संधी मिळालेली नाही. अनेक माजी नगरसेवकांनाही कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही.
अशी आहे कार्यकारिणी
प्रभारी महानगर प्रमुख (नागपूर महानगर) : प्रमोद मानमोडे
महानगर संघटक : मंगेश काशीकर (दक्षिण व दक्षिण-पश्चिम नागपूर)
किशोर पराते (पश्चिम अणि मध्य नागपूर)
विशाल बरबटे (उत्तर आणि पूर्व नागपूर)
शहरप्रमुख : दीपक कापसे (मध्य, दक्षिण अणि दक्षिण-पश्चिम नागपूर),
नितीन तिवारी (उत्तर, पूर्व आणि पश्चिम नागपूर)
उपमहानगर प्रमुख : बंडू तळवेकर (उत्तर नागपूर), गुड्डू रहांगडाले (पूर्व नागपूर),
दिगंबर ठाकरे (पश्चिम नागपूर)
सहसंपर्क प्रमुख : सतीश हरडे (दक्षिण-पश्चिम अणि उत्तर नागपूर),
शेखर सावरबांधे (पूर्व आणि पश्चिम नागपूर),
किशोर कुमेरिया (मध्य आणि दक्षिण नागपूर)