नागपूर : शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेने आता लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभेसाठी प्रत्येक मतदारसंघाची नव्याने बांधणी करून कार्यकर्त्यांची फळी उभारण्यासाठी लोकसभा संपर्कप्रमुख नेमण्यात आले आहेत. विदर्भातील दहा मतदारसंघाची जबाबदारी खा. प्रतापराव जाधव, खा. कृपाल तुमाने, खा. भावना गवळी, आ. आशीष जयस्वाल व किरण पांडव यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
खा. कृपाल तुमाने हे स्वत:च्या रामटेक लोसभा मतदारसंघासह नागपूर लोकसभा मतदारसंघाचेही संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडतील. अकोला व बुलढाणा या दोन मतदारसंघांसाठी खा. प्रतापराव जाधव हे संपर्कप्रमुख असतील. संपर्कनेत्या खा. भावना गवळी या यवतमाळ-वाशिम व चंद्रपूर तर आ. आशीष जयस्वाल हे अमरावती व भंडारा-गोंदिया चे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहतील. पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख असलेले किरण पांडव यांच्यावर वर्धा तसेच गडचिरोली-चिमूर या दोन मतदारसंघांचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
याशषिवाय खा. हेमंत पाटील यांच्याकडे नांदेड व हिंगोली, आ. अर्जून खोतकर- जालना व परभणी, गोपाळ लांडगे - छत्रपती संभाजीनगर, आ. ज्ञानराज चौगुले - धाराशीव व लातुर, चंद्रकांत रघुवंशी - नंदूरबार व धुळे, आनंदराव जाधव - जळगाव व रावेर, विजय नहाटा - दक्षिण नगर, यशवंत जाधव - शिर्डी व खा. श्रीरंग बारणे यांच्याकडे मावळ व पुणे मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.