नागपूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे एक नंबरचे खोटारडे आहेत. तर, कपडे उतरण्याचे संकेत मिळाल्याने त्यांचे ट्वीट खोटे आहे, असे सांगून भाजपा नेते त्यांचे कपडे सांभाळत आहेत. मात्र, हे प्रकरण एवढे सोपे नाही. ट्विटरचे मालक एलन मस्क यांच्याकडे हे प्रकरण गेल्यास एका मिनिटात दूध का दूध अन् पाणी का पाणी होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.
विधानसभेच्या पायऱ्यांसमोर पत्रकारांशी चर्चा करताना आव्हाड यांनी सीमावाद तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या नेत्यांवर भाष्य केले. पत्रकारांनी त्यांना बोम्मईवर बोलते करण्याचा प्रयत्न केला. यावर आव्हाड अघळपघळ बोलले. नुसते बोललेच नाही तर त्यांनी हे ट्वीट एलन मस्क यांच्याकडे पाठवा, अशी मागणीही केली. ते म्हणाले, बोम्मई एक नंबरचे खोटारडे आहेत. त्यांचे ट्विटर दुसरे कुणी कसे हॅण्डल करू शकतो. भाजपा नेते म्हणतात की, हा एक गुन्हेगारी कट आहे. तर त्याचा भंडाफोड का होत नाही. त्याचा खराखुरा भंडाफोड करायचा असेल तर सरळ बोम्मईचे ट्वीट एलन मस्ककडे पाठवा. मस्क कुणाचाच हस्तक्षेप सहन करत नाही आणि कुणाला गिनतही नाहीत. त्यांना बोम्मईचे ट्टीट पाठवून त्याच्याबद्दल विचारणा केल्यास एका मिनिटात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.
भाजपा नेत्यांवर बोलताना आव्हाड म्हणाले, बोम्मईचे कपडे उतरण्याचे त्यांना संकेत मिळाले आहेत. त्यामुळे ते त्यांचे कपडे सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, या प्रयत्नात भाजपा नेत्यांचेच कपडे उतरणार असल्याचेही आव्हाड म्हणाले. त्यांनी यावेळी कथित १०० कोटींच्या जमिनीची दोन कोटीत विक्री झालेल्या एका न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबतही येथे भाष्य केले.
----