लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : शाळेचे कामकाज सुरळीत राहण्यासाठी मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्तीआधी पदाेन्नती प्रस्ताव तयार करावे. ते सेवानिवृत्तीच्या किमान आठ महिन्यापूर्वी पाठवावे. यापुढे आर्थिक व प्रशासकीय अधिकार तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी राहणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र काटाेलकर यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षा यांच्यावतीने आयाेजित कार्यक्रमात दिली.
अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष मारोती खेडीकर तर प्रमुख अतिथी म्हणून आ. अभिजित वंजारी, ओबीसी महासंघाचे डाॅ. बबन तायवाडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र काटोलकर उपस्थित हाेते. प्रत्येक शाळेत वाचनालय, प्रयाेगशाळा व स्वच्छतागृह आवश्यक असल्याचे रवींद्र काटाेलकर यांनी सांगितले.
ओबीसी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन डाॅ. बबन तायवाडे यांनी केले तऱ आ. अभिजित वंजारी यांनी पदवीधर भवन बांधण्याचा मानस व्यक्त केला. सतीश जगताप, अशोक पारधी यांचीही भाषणे झाली. मयुर आव्हाड यांनी समृद्धी प्रज्ञा शाेध परीक्षेची माहिती दिली. हरिभाऊ खोडे यांनी प्रास्ताविकातून शाळांमधील विविध समस्यांचा आढावा घेतला. संचालन श्याम बांते यांनी केले तर ज्ञानेश्वर गलांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष गोरे, शहरध्यक्ष नाजरा पटेल, मधुसूदन मुळे, झलके, सज्जन पाटील यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.