बंटी कुकडे यांनी सोपविला परिवहन अर्थसंकल्प : दर दहा मिनिटांनी बस सेवा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘आपली बस’मध्ये ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना तिकीटात सवलत दिली जाणार अहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्ग ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सूट देण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याच प्रकारे पंडित दीनदयाल उपाध्याय, पथ अंत्योदय योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना सहल, क्रीडा स्पर्धा व अन्य बाबींसाठी सूट देण्याकरिता ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परिवहन समितीचे अध्यक्ष बंटी कुकडे यांनी शुक्रवारी परिवहन समितीचा २०१७-१८ चा २५४.५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांना सादर केला. शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागपूर शहरात बायो डिझेल व विजेवर चालणाऱ्या बस चालविल्या जातील तसेच नागपूरकरांना प्रत्येक रस्त्यावर दर १० ते १५ मिनिटांनी बस सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे कुकडे यांनी अर्थसंकल्प सोपविताना सांगितले. कुकडे म्हणाले, प्रवाशांच्या सोयीसाठी शहरातील शहर बस स्टॉपजवळ चहा-नाश्त्याची दुकाने सुरू करून देण्याची व्यवस्था परिवहन विभाग करेल. शहरात १५० बस स्टॉप आहेत. ज्या मार्गांवर खूप गर्दी असते व जेथे दुकानासाठी जागा उपलब्ध आहे तेथेच दुकान सुरू केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे आपली बसला नुकसान होत आहे. याबाबत आरटीओ व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात सुरू असलेली सिमेंट रस्त्यांची कामे, मेट्रो रेल्वेचे काम व शाळा महाविद्यालयांना असलेल्या सुट्या यामुळे बसच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. जूनच्या शेवटी बस फेऱ्या वाढविण्यावर भर दिला जाईल. ३० ते ६० फूटांच्या रस्त्यावर मिडी व मिनी बस चालविण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही कुकडे यांनी सांगितले. इथेनॉलवर आधारित ग्रीन बसला प्रवाशांचा फासरा प्रतिसाद दिसून येत नाही. जानेवारी २०१८ पर्यंत ग्रीन बसचे प्रवासी व फेऱ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी ‘आपली बस, आपली तक्रार’ नावाने टोल फ्री व व्हॉट्सअॅप नंबर जारी केला जाईल. राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेंतर्गत पाच महिला स्पेशल बस चालविल्या जातील. या मिनी राहतील. उत्पन्न १३.३४ कोटी, खर्च १९.३० कोटी १ मार्च ते ४ जूनपर्यंत परिवहन विभागाला तिकिटाच्या माध्यमातून १३.३४ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. आॅपरेटरची देणी, मशीनची फिटिंग, मूलभूत सुविधा आदीवर एकूण १९.३० कोटी रुपये खर्च झाले आहेत. उत्पन्नात ५ कोटी रुपयांनी माघारल्यानंतरही २५४ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्याबाबत व उत्पन्नाची साधने विचारली असता परिवहन विभागाचे शिवाजीराव जगताप समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. प्रत्येक ठिकाणी बस सेवा तोट्यात सुरू आहे. नागपुरातही ती तोट्यात आहे, असे उत्तर त्यांनी दिले.
ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना बस तिकिटात सूट
By admin | Published: June 10, 2017 2:56 AM