निशांत वानखेडे
नागपूर : आयुष्यभर मुलांच्या संगाेपनात, त्यांच्या प्रगतीसाठी आयुष्य खर्ची घातल्यानंतर सोनेरी दिवस येतील आणि रोजची सायंकाळही आनंदाची असेल, अशी अपेक्षा ज्येष्ठांची असते. मात्र, मुले दूर गेल्याने मावळतीलाही त्यांना संघर्ष करावा लागताेय. उपराजधानीत अशा ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. मुले विदेशात गेली किंवा कुटुंब दूर झालेल्या ज्येष्ठांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागताे. साधा किराणा, दूध, दवाखाना आणि औषधांसाठीही फरपट सहन करावी लागत आहे. (Senior Citizens Day)
काेराेना महामारीच्या काळात या ज्येष्ठांना सर्वाधिक संघर्ष करावा लागला आणि त्यामुळे अशा नागरिकांची अडचण प्रकर्षाने समाेर आली. ज्येष्ठांची अनेक जाेडपी आहेत, ज्यांची मुले विदेशात सेटल झाली आहेत. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये ही समस्या वाढली आहे. शिवाय काही असेही आहेत, ज्यांनी आई-वडिलांना वाऱ्यावर साेडून वेगळा संसार थाटला आहे. पडत्या काळात आधार देणारे कुणीच नसल्याने लहान-लहान गाेष्टींसाठीही ज्येष्ठांना संघर्ष करावा लागताे. काहींची अवस्था तर दयनीय झाली आहे. अनेकांना चालणेही मुश्किल आहे. त्यांना दुधापासून किराणा ते रुग्णालयात जाण्यापासून औषध आणण्यासाठी कुणीतरी आधार देईल, याची प्रतीक्षा असते. पैसे संपले की बॅंकेत जाणेही मुश्किल असते आणि पैसे काढण्यासाठी कुणावर विश्वासही ठेवता येत नाही, अशी त्यांची द्विधा अवस्था झाली आहे. काेराेना काळात काही सामाजिक संस्थांनी मदत केली पण पुढे काय, हा प्रश्न आहे.
पाेलिसांचा ‘भराेसा’, ५८७६ ज्येष्ठांची नाेंद
अशा ज्येष्ठांच्या सेवेसाठी पाेलीस विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाेलिसांच्या ‘भराेसा सेल’ने त्यांना आधार देण्याचे काम केले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी सेलची विशेष विंग कार्यान्वित करण्यात आली. याआधारे शहरातील ५,८७६ ज्येष्ठांची नाेंद आतापर्यंत करण्यात आली. त्यात २३१ जाेडपी किंवा एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांचा समावेश आहे. केवळ तक्रार निवारणच नाही तर त्यांना औषधे, किराणा, दवाखान्यात नेण्यापासून ते जेवणाचा डबा लावून देण्यापर्यंतचे काम भराेसा सेलच्या टीमने केले आहे.
ज्येष्ठांविरूद्धच्या गुन्ह्यातही वाढ
देशात ज्येष्ठ नागरिकांविरूद्ध हाेणाऱ्या गुन्ह्यामध्ये सातत्य आहे. २०१८ मध्ये २४३४९, २०१९ मध्ये २७८०४ तर २०२० मध्ये २४७९४ गुन्हे घडले. महाराष्ट्रात या काळात अनुक्रमे ५९६१, ६१६३ व ४९०९ गुन्हे घडले. यामध्ये जखमी करण्याच्या १५३९, हल्ल्याच्या ४५, चाेरीच्या १०७०, लुटपाटीच्या २३८, खंडणी मागण्याच्या १८, ज्येष्ठांच्या संपत्तीवर अतिक्रमण करण्याच्या १०६, फसवणुकीच्या ८६६ घटनांचा समावेश आहे. या काळातील ६४४९ गुन्हे प्रलंबित असून ५५.८ टक्केवारी आहे.