लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गणेशपेठ आगारात परिवहन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परिवहन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही बसमध्ये ४५ टक्के सवलत तर स्लिपर क्लास बसमध्ये ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई येथील उपमहाव्यवस्थापक सुधीर पंचभाई, नागपूरचे विभाग नियंत्रक अशोक वरठे यांनी दिली.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सुरुवात १ जून १९४७ रोजी झाली. त्यानिमित्त शुक्रवारी गणेशपेठ आगारात परिवहन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना उपमहाव्यवस्थापक सुधीर पंचभाई, विभाग नियंत्रक अशोक वरठे म्हणाले, गणेशपेठ आगाराचे नूतनीकरण होत असल्यामुळे सध्या प्रवाशांना त्रास होत आहे. परंतु लवकरच हा त्रास दूर होऊन प्रवाशांना चांगली सेवा पुरविण्यात येईल.गणेशपेठ आगारात नव्याने २० प्लॅटफार्म तयार करण्यात येत आहेत. यात चालक-वाहकांना विश्रांतीसाठी नवा हॉल तयार करून त्यात त्यांना सोईसुविधा पुरविण्यात येणार आहेत. सध्या नागपूर विभागात विविध मार्गावर ६५ शिवशाही बसेस सुरू आहेत.यातील ३८ बसेस एसटी महामंडळाच्या मालकीच्या तर २७ बसेस खासगी मालकीच्या आहेत. गुणवत्ता वाढवून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा देणे एसटी महामंडळाने सुरू केल्यामुळे अलीकडच्या काळात महामंडळाचे प्रवासी वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.गणेशपेठ आगारात महानगरपालिकेतर्फे अपुरा पाणी पुरवठा होत असल्यामुळे प्रवाशांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी नागपूर ते भंडारा प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक सुनील मेहता यांना शिवशाही बसचे सवलतीचे तिकीट विभाग नियंत्रक अशोक वरठे यांनी सोपवून ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीचा शुभारंभ केला. कार्यक्रमाला प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी अशोक वाडीभस्मे, आगार व्यवस्थापक विजय कुडे, वाहतूक निरीक्षक अजय हट्टेवार उपस्थित होते.
शिवशाही बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 10:34 AM
परिवहन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही बसमध्ये ४५ टक्के सवलत तर स्लिपर क्लास बसमध्ये ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई येथील उपमहाव्यवस्थापक सुधीर पंचभाई, नागपूरचे विभाग नियंत्रक अशोक वरठे यांनी दिली.
ठळक मुद्देपरिवहन दिनापासून शुभारंभ शिवशाहीत ४५, स्लिपरक्लासमध्ये ३० टक्के सवलत