काेंढाळी : काेंढाळी (ता. काटाेल) येथे भारतीय स्टेट बँक (एसबीआय) व बँक ऑफ इंडिया या दाेन राष्ट्रीयीकृत बँकेच्या प्रत्येकी एक शाखा आहे. यात एसबीआयमध्ये खातेदारांची संख्या बरीच माेठी आहे. या शाखेत रकमेची उचल करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना रांगेत तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. शिवाय, बँक कर्मचारी सन्मानजनक वागणूक देत नाहीत, असा आराेपही त्यांनी केला आहे.
एसबीआयच्या काेंढाळी शाखेत स्थानिक व परिसरातील गावांमधील व्यापारी, शासकीय व खासगी कर्मचारी, शेतकरी, कामगार, पेन्शनधारक, शासकीय याेजनांचे लाभार्थी यांच्यासह इतर नागरिकांची खाती असल्याने या शाखेच्या खातेदारांची संख्या माेठी आहे. त्यामुळे बँकेत राेज खातेदारांची गर्दी असते. ही शाखा पहिल्या मजल्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिकांना वर चढण्यासाठी लिफ्ट अथवा रॅम्पची साेय नाही. आत काऊंटरसमाेर जागा नसल्याने खातेदारांना दाटीदाटीने रांगेत उभे राहावे लागते. यात महिलांची कुचंबणा हाेते.
ज्येष्ठ नागरिकांना रांगेत बराच वेळ उभे राहणे शक्य हाेत नसल्याने ते नंबर जाऊ नये म्हणून मध्येच बसतात. त्यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांच्या राेषाला सामाेरे जावे लागते. कर्मचारी लहानसहान चुकांसाठी उद्धट उत्तर देत असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकांनी दिली. याकडे बँक व्यवस्थापन लक्ष देत नसल्याचा आराेपही त्यांनी केला.
--
‘लिंक फेल’ असल्याचे कारण
बाहेरगावाहून आलेल्या वयाेवृद्ध व्यक्तीला या शाखेत तीन हजार रुपये काढण्यासाठी दाेन तास रांगेत उभे राहावे लागते. याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, ते प्रत्येक वेळी ‘लिंक फेल’ असल्याचे कारण सांगतात. दुसरीकडे, हेच कर्मचारी कामाच्या वेळी आपसात अथवा फाेनवर गप्पा करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकाराबाबत बँक अधिकारी काहीही बाेलायला तयार नाहीत.
---
या शाखेत खातेदारांची संख्या अधिक असून, तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या बरीच कमी आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढताे. खातेदारांना त्रास हाेताे. परंतु त्याला आम्ही काहीही करू शकत नाही.
- रेणुका कायंदे,
शाखा व्यवस्थापक, एसबीआय, काेंढाळी.