लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या प्रकृतीत आराम असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना धंतोली येथील अवंती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे चाहते व नातेवाईकांची चिंता वाढली होती.मूळचे धामणगाव येथील रहिवासी असलेले राजदत्त यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. याशिवाय दूरदर्शनवरील मालिका, लघुपट, माहितीपट व काही नाटकांची निर्मिती त्यांनी केली. त्यांचे गुरू राजा परांजपे यांच्यासोबत १३ वर्षे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९६७ ला मधुचंद्र या चित्रपटापासून स्वतंत्र दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. पुढे घरची राणी, अरे संसार संसार, शापित, सर्जा या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी या काळात २४ चित्रपटांची निर्मिती केली. त्यापैकी ११ चित्रपटांना राज्य शासनाचे १४ पुरस्कार प्राप्त झाले. नऊ प्रथम, तीन द्वितीय, दोन तृतीय तर एका चित्रपटाला शासनाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. एवढे पुरस्कार प्राप्त करणारे ते मराठीतील एकमेव दिग्दर्शक होत. त्यांच्या शापित, सर्जा आणि एका चित्रपटाला केंद्र शासनाचे रजत कमळ पुरस्कार प्राप्त झाले आहे. याशिवाय त्यांनी काही मालिकांचीही निर्मिती केली आहे. पुरस्कारप्राप्त गोट्या ही त्यांनीच दिग्दर्शित केलेली मालिका आहे. समर्थ रामदास यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्रातील पहिले महानाट्य त्यांनी तयार केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेले राजदत्त यांनी सरसंघचालक हेडगेवार यांच्या जीवनावर माहितीपटासह काही लघुपट व माहितीपट निर्माण केले आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर महानगरपालिका यांच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गुरुवारी त्यांचा सत्कार केला जात असून, त्यानिमित्त ते नागपूरला आले आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांची प्रकृती ठणठणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:28 AM
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या प्रकृतीत आराम असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना धंतोली येथील अवंती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे चाहते व नातेवाईकांची चिंता वाढली होती.
ठळक मुद्देरुग्णालयातून सुटी : आज होणार त्यांचा सत्कार