नागपूरः विदर्भाच्याच नव्हे तर, महाराष्ट्राच्या कीर्तनक्षेत्रातील अग्रगण्य कीर्तनकार ह.भ.प. प्रा. डाॅ. दिलीप डबीर यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात कीर्तनकार पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. गुरुवारी दुपारी २ वाजता सहकारनगर घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सहकारनगर येथील गजानन मंदिरामागे राहणारे डबीर हे धरमपेठ महाविद्यालयातून मराठीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.‘मराठीतील कीर्तनकार’ या विषयावर त्यांनी पीएच. डी. प्राप्त केली होती. डबीर कुटुंब हे मूळचे ब्रह्मपुरी येथील आहे. त्यांचे वडील चंद्रपूरच्या सहकारी बँकेत व्यवस्थापक असल्याने दिलीप डबीर यांचे शालेय शिक्षण चंद्रपूरला आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. आपल्या ओजस्वी वाणीतून कीर्तनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना जागरूक करणारे कीर्तनकार अशी त्यांची ख्याती होती. उत्कृष्ट कलावंत, मनमिळाऊ मित्र गमावल्याच्या संवेदना कला, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींकडून व्यक्त होत आहेत.