Nagpur Court : नागपूर जिल्हा न्यायालयात कोर्टाचे कामकाज सुरु असतानाच वकिलाला हृदयविकाराचा झटका आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर थेट न्यायाधिशांनी आपल्या जागेवरुन धाव घेत वकिलाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यानंतर वकिलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र सर्वांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि वकिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वकिलाची प्राणज्योत मावळल्याने जिल्हा न्यायालयात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी न्यायाधीश एस.बी. पवार यांच्या न्यायालयात एका खटल्याची चर्चा सुरू होती. त्यादरम्यान ६५ वर्षीय ज्येष्ठ वकील तलत इक्बाल कुरेशी आपल्या खटल्याच्या सुनावणीची वाट पाहत होते. त्यानंतर ज्येष्ठ वकील कुरेशी यांची प्रकृती खालावली आणि ते अचानक जमिनीवर कोसळले. हे पाहून त्या वेळी अन्य कोणत्या तरी खटल्याची सुनावणी करत असलेले न्यायाधीश पवार अचानक खुर्चीवरून उठले आणि लगेच खाली गेले.
न्यायाधीश पवार यांनी तात्काळ कुरेशी यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही परिणाम झाल्याचे दिसत नव्हते. या वेळी अन्य एका वकिलाने नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी सचिव अधिवक्ता नितीन देशमुख यांच्याशी संपर्क साधून त्यांना वैद्यकीय मदतीची विनंती केली. देशमुख कोर्टरूममध्ये पोहोचले तोपर्यंत कुरेशी बेशुद्ध अवस्थेत होते. यानंतर काही वेळातच न्यायाधीश पवार आणि देशमुख यांनी कुरेशी यांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचताच, कुरेशी यांना आयसीयूमध्ये नेण्यात आले परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे नितीन देशमुख यांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत नितीन देशमुख यांनी एसयूव्हीच्या मागील सीटवर बेशुद्ध कुरेशी यांची काळजी घेतली होती. न्यायाधिश पवारांच्या अथक प्रयत्नानंतरही न्यायालयाजवळील हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी कुरेशी यांना मृत घोषित केले. कुरेशी हे काही दिवसांपासून अस्वस्थ होते.
देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, कुरेशी यांनी काही वेळापूर्वी ॲसिडिटीचा त्रास जाणवल्याने इनो घेतला होता. मात्र, घटनेच्या दोनच दिवस आधी एका डॉक्टरने कुरेशी यांना ईसीजी करण्याचा सल्ला दिला होताय मात्र कुरेशी यांनी तसे केले नव्हते. अशातच शनिवारी ज्येष्ठ वकील कुरेशी यांना कोर्ट रुममध्ये हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.