लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ संगीतज्ञ आणि संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचे मार्गदर्शक बाळासाहेब उपाख्य विराग यादवराव होले यांचे धरमपेठ येथील निवासस्थानी निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी रागिणी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील अनेकांचा मार्गदर्शक हरपला आहे. संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचे चाहते आणि त्यांच्या शिष्य परिवारातर्फे लॉकडाऊनच्या अगोदर त्यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. देशभरातील आंतराष्ट्रीय कीर्तीचे गायक, वादक आणि संगीतकारांशी नागपुरात राहून वैयक्तिक संबंध ठेवणारे बाळासाहेब होते. अनेक नामवंत गायकांना जाहीर मैफिलीत त्यांच्या सादरीकरणातली चूक दाखवून देण्याचे धाडस त्यांनी केले. त्यामुळेच नागपुरात जाहीर मैफिलीत गाताना बाळासाहेब असले तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे गायकही चूक होऊ नये याची काळजी घेत असत. त्यांनी ‘चिल्लाह’ नावाची संगीत साधना केली होती. त्यांचे सांगीतिक ज्ञान अफाट होते. संपूर्ण राज्यात संगीत समीक्षा करणाऱ्या विविध पत्रकारांना त्यांनी संगीत समीक्षा कशी करावी, याचे ज्ञान दिले होते. विविध वर्तमानपत्रांतून त्यांनी ओघवत्या भाषेत केलेली संगीत समीक्षा अनेकांच्या सांगीतिक ज्ञानात भर घालणारी होती. त्यांना ‘सूरमुरिद’ हा किताब मिळाला होता. नागपुरातील अनेक संस्थांना संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली असून देशभरातील संगीताच्या क्षेत्रातील दिग्गजांशी मैत्रीपूर्ण संबंध असणारा एक मार्गदर्शक हरपल्याचे दु:ख नागपुरातील संगीत क्षेत्रात व्यक्त करण्यात आले.
नागपुरातील ज्येष्ठ संगीत समीक्षक बाळ होले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 9:49 PM