लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील ज्येष्ठ कवी व गीतकार मुकुंद शंकरराव पुल्लीवार यांचे रविवारी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या गजानन महाराज चौक, रेशीमबाग येथील निवासस्थानी त्यांनी अंतिम श्वास घेतला.चंद्रपूर जिल्ह्यातील बेंबाळ गावी जन्मलेल्या मुकुंद पुल्लीवार यांची आध्यात्मिक प्रवृत्तीचे संवेदनशील कवी म्हणून ख्याती राहिली आहे. उपजतच दैवी प्रतिभेचे लेणे लाभलेल्या पुल्लीवार यांनी लहानपणापासूनच शब्दब्रह्माची निष्ठापुर्वक उपासना केली आहे. या उपासनेतून त्यांनी ३ खंडकाव्य, २२ गीतसंग्रह, कविता, संस्कारगीते, चरित्र गीते, संघ गीते, दोन सांगितिका, चरित्रलीलामृत, भक्तिगीते अशा विविधांगी साहित्याची निर्मिती केली व ती रसिकाचरणी अर्पण केली. त्यात दिव्य वाणी केशवाची, जोगवा, श्रीगणेश ओंकार, स्मृतिगंध ज्ञानियाचा, अक्कलकोटची गीतगंगा या काव्यसरितांचा उल्लेख करावा लागेल. त्यातील अनेक काव्यरचना ध्वनिमुद्रित झाल्या असून नामवंत गायकांच्या गळ्यातून त्या रसिकांमध्ये लोकप्रियही ठरल्या आहेत. त्यांच्या निधनाने चरित्र्यसंपन्न, सद््गुणी व आध्यात्मिक प्रवृत्तीचा प्रतिभावंत कवी हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १ वाजता गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.
ज्येष्ठ कवी मुकुंद पुल्लीवार यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:05 AM