लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेच्या जबाबदारीत सहभागी, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ समता सैनिक भालचंद्र राजाराम लोखंडे यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.भालचंद्र लोखंडे यांचा जन्म हिंगणा तालुक्यातील टाकळी येथे झाला. घरात असलेल्या दारिद्र्यामुळे आजोबांच्या आसऱ्याने ते उंटखाना येथे आले. पुढे मिलमध्ये नोकरी मिळाल्यानंतर ते येथे स्थायिक झाले. लहानपणापासून समता सैनिक दलाबाबत आकर्षण होते व त्यांनी तसे प्रशिक्षणही घेतले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नागपुरात झालेल्या अनेक सभांमध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या जबाबदारीत सहभागी झाले होते. १९४५ ला कस्तूरचंद पार्क येथे झालेल्या डॉ. बाबासाहेबांच्या परिषदेत बालसैनिक म्हणून ते सहभागी होते व सलामीही दिली होती. १९५२ ला लष्करीबागेतील सभा व ५६ च्या धम्मदीक्षा सोहळ्याच्या सुरक्षेत त्यांचा सहभाग होता. धम्मदीक्षेनंतरही ते बाबासाहेबांच्या सुरक्षेत सहभागी होते. १९५४ साली झालेल्या भंडारा येथील निवडणुकीत त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रचारकार्यात सहभाग घेतला. १९६८ च्या जातीय दंगलीत त्यांना कारावास भोगावा लागला. मात्र शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांनी पुन्हा दलाचे कार्य सुरू केले, ते शेवटच्या श्वासापर्यंत. एसएसडी व रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी त्यांनी आजीवन प्रयत्न केले.बाबासाहेबांच्या चळवळीशी संबंधित लेखन साहित्य त्यांनी संग्रहित केले आहे; शिवाय स्वत:ही काही पुस्तकांचे तसेच कविता व गझलांचे लेखनही केले आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील समता सैनिक हरविल्याची भावना व्यक्त केली जात आहे.