ऑनलाईन लोकमत नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात २४ तासांत दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यात एक २७ वर्षीय तरुणाचा समावेश असून त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात कोणी अधिकारी बोलायला तयार नाही. मात्र, गेल्या वर्षी गळा दाबून हत्या केलेल्या दोन मनोरुग्णाच्या घटनेला याच्याशी जोडून पाह्यले जात आहे.निरंजन नागपुरे (२७) रा. वर्धा असे एका मृताचे नाव असून, दुसऱ्या ६७ वर्षीय मृताची अनोळखी म्हणून रुग्णालयात नोंद आहे.प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन मनोरुग्णाचा गळा दाबून हत्या झाल्याची घटना ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. यात उपचार घेत असलेले ४४ वर्षीय जयंत नेरकर यांचा मृत्यू १७ सप्टेंबर २०१६ रोजी तर ६० वर्षीय मालती पाठक यांचा मृत्यू ६ आॅक्टोबर २०१६ रोजी झाला. या दोघांचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबून झाल्याचा शवविच्छेदन विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले होते. या घटनेला घेऊन हिवाळी व उन्हाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाले होते. आरोग्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या चौकशीचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. असे असताना हे दोन्ही मृत्यू आणि निरंजन नागपुरे याचा झालेला मृत्यू ही घटना सारखीच असल्याचे बोलले जात आहे. निरंजन नागपुरे हा गेल्या पाच दिवसांपासून मेडिकलमध्ये उपचार घेत होता. त्याला ‘हायपोनायट्रोमिया’(शरीरातील सोडियम कमी होणे) नावाचा आजार होता. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर गुरुवारी रात्री ८ वाजता त्याला मेडिकलमधून सुटी देण्यात आली. शुक्रवारी सकाळी ६ वाजता अटेंडंट निरंजनला उठविण्यास गेला असता तो खाटेवर मृतावस्थेत पडला होता. रुग्णालय प्रशासनाने याची माहिती मानकापूर पोलीस ठाण्याला दिली असून, निरंजनचा मृतदेहशवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू मेडिकलमध्येच झाला. ६७ वर्षीय हा रुग्ण अनोळखी असून न्यायालयाच्या निर्देशानुसार मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मूत्रपिंड निकामी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.