लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यशोधरानगर येथे एका विवाहितेने मित्राच्या मदतीने पतीची हत्या केली. पोलिसांनी केवळ चार तासात प्रकरण उघडकीस आणत आरोपी पत्नी व तिच्या मित्राला अटक केली. शेखर रमेश पौनीकर (२८) रा. साहूनगर पाच मोहल्ला यशोधरानगर असे मृताचे नाव आहे. तर शेखरची पत्नी रश्मी पौनीकर (२५) आणि तिचा मित्र प्रज्वल ऊर्फ रणजित भैसारे (२१) रा. म्हाडा कॉलनी, नारी असे आरोपीची नावे आहे. अनैतिक संबंधाच्या शंकेवरून पती आपल्याला नेहमीच मारहाण करीत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून आपण हे कृत्य केल्याची कबुली पत्नीने दिली आहे.मृत शेखर महाल येथील एका गारमेंट दुकानात काम करीत होता. चार वर्षापूर्वी त्याने रश्मीसोबत प्रेमविवाह केला. त्यांना दोन वर्षाचा मुलगा डुग्गू आहे. शेखरला दारूचे व्यसन होते. या व्यसनामुळे तो कर्जबाजारी झाला होता. त्याने रश्मीला घरखर्चासाठी पैसे देणेही बंद केले होते. त्याने दागिने, दुचाकी आणि मोबाईलही गहाण ठेवले होते.सूत्रानुसार शेखरसोबत लग्न करण्यापूर्वी रश्मीची युवकांसोबत मैत्री होती. तिला दुसऱ्यांसोबत बोलताना पाहून शेखरला प्रचंड राग यायचा. यावरून दोघांमध्ये वाद व्हायचे. रश्मीसुद्धा शेखरच्या वागण्यामुळे त्रस्त झाली होती. ती शेखरला घटस्फोट मागत होती. परंतु शेखर नकार देत असल्याने ती दुखावली होती. सहा महिन्यांपूर्वी तिची प्रज्वलसोबत मैत्री झाली. प्रज्वल बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तो एलईडीचे कामही करतो. थोड्यात दिवसात दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. रश्मीने प्रज्वलला पती खूप त्रास देत असल्याचे सांगत पतीपासून सुटका करून देण्यास मदत मागितली. परंतु प्रज्वल तयार झाला नाही. काही दिवसांपासून रश्मी आणि शेखरचा वाद प्रचंड वाढला. यामुळे रश्मीने त्याला लवकरच संपवण्याचा निर्णय घेतला. ती प्रज्वलवर पतीची हत्या करण्यासाठी दबाव टाकू लागली. शेवटी तोही तयार झाला. त्यांच्यात ठरलेल्या योजनेंतर्गत मंगळवारी रात्री १२ वाजता रश्मीने प्रज्वलला फोन करून रात्री २ वाजता ब्लेड घेऊन येण्यास सांगितले. प्रज्वल रश्मीच्या घरी पेहोचला. त्या दोघांनी झोपेतच दोरीने शेखरचा गळा दाबून हत्या केली. यानंतर मृतदेह दुचाकीने घराजवळून थोड्या दूर अंतरावर असलेल्या नामदेव उद्यानाजवळ नेऊन फेकला.शेखरचा मृत्यू झाला नसेल म्हणून ब्लेडने त्याच्या हाताची नसही कापली. यानंतर दगडाने त्याचे डोके ठेचले. प्रज्वल रश्मीला तिच्या घरी पोहोचवून आपल्या घरी निघून गेला.बुधवारी सकाळी नागरिकांना शेखरचा मृतदेह आढळून आला. लगेच ओळख पटल्याने पोलिसांनी रश्मीला ठाण्यात आणले. तिला शेखरबाबत विचारणा केली. तेव्हा रात्री जेवण केल्यानंर तो घरातून बाहेर पडल्याचे तिने सांगितले. तेव्हापासून तो गायब असल्याचे सांगितले. पती रात्रभर गायब असूनही कुणाला का सांगितले नाही, याबाबत विचारणा केली असता ती समाधानकारक उत्तर देत नव्हती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी रश्मीचे घरमालक आणि परिसरातील लोकांना विचारपूस केली. तेव्हा दोघांचे नाते तणावपूर्ण असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रश्मीच्या मोबाईलची तपासणी केली असता ती रात्री १२ वाजता प्रज्वलसोबत बोलल्याचे दिसून आले. यावरून पोलिसांचा संशय आणखी बळावला.पोलीस प्रज्वललाही विचारपूस करायला घेऊन आले. यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी हत्येची कबुली दिली. नंतर दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पी.जे. रायन्नावार, एपीआय पंकड बोंडसे, पीएसआय उल्हास राठोड, कर्मचारी दीपक धानोरकर, प्रकाश काळे, विजय राऊत, विनोद सालव, गजानन गोसवी, संतोष यादव, नीलेश घायवट, लक्ष्मीकांत बारलिंगे, नरेश मोडक, विजय लांजेवार, रत्नाकर कोठे, आफताब, गणेश आणि रोशनी दहीकर यांनी केली.फेसबुक मैत्रीने केले जीवन उद्ध्वस्तप्रज्वल गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि लहान भाऊ आहे. तो शिक्षणासोबतच घरातील खर्च उचलण्यासाठी कामही करतो. रश्मी नेहमीच फेसबुकवर अॅक्टिव्ह राहते. प्रज्वलची रश्मीसोबत मैत्री फेसबुकच्या माध्यमातूनच झाली होती. लवकरच दोघे एकमेकांना भेटूही लागले. प्रज्वलने कधी मनात विचारही केला नसेल की या मैत्रीतून तो हत्येसारखा गुन्हाही करेल. त्याने केलेल्या या कृत्यामुळे त्याचे आई-वडील आणि भावालाही धक्का बसला आहे.प्रेमविवाहाचा दु:खद अंतशेखरने रश्मीसोबत चार वर्षांपूर्वी लग्न केले होते. सुरुवातीला दोघांचे नाते चांगले राहिले. परंतु रश्मी सोशल मीडियावर ‘ओव्हर अॅक्टिव्ह’ राहू लागल्याने आणि मित्रांच्या संपर्कात राहत असल्याने शेखर दु:खी होता. तो रश्मीकडे संशयाच्या नजरेने पाहत होता. यामुळे रश्मी दु:खी होती. ती मित्रांना सोडण्याऐवजी शेखरला सोडायला तयार होती. रश्मीने शेखरची हत्या केल्याने शेखरचे आईवडिलांना धक्का बसला आहे. शेखरला तीन विवाहित बहिणी आहेत.