लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यासह मध्यवर्ती कारागृहातील पाच अधिकारी, दोन कर्मचारी आणि दोन अट्टल गुन्हेगार अशा नऊ जणांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार करून एका तृतीयपंथीयाने राज्य कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा या प्रकरणात धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला, तर शुक्रवारी लोकमतने हे वृत्त ठळकपणे प्रकाशित केल्यामुळे संपूर्ण राज्याच्या कारागृह प्रशासनात भूकंपाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकरणाची चोहोबाजूने चौकशी केली जात आहे.
चमचम गजभिये या तृतीयपंथीयाच्या हत्येच्या आरोपात जून २०१९ पासून तृतीयपंथी उत्तम बाबा सेनापती ऊर्फ सपन कारागृहात बंद आहे. त्याने न्यायालयाला पत्र लिहून मध्यवर्ती कारागृहाचे पाच तुरुंगाधिकारी, दोन कर्मचारी आणि दोन गुन्हेगार असे नऊ जण दीड वर्षांपासून लैंगिक शोषण करीत असल्याची तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने उत्तम बाबाला धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी नेण्याचे आदेश येथील कारागृह अधीक्षकांना दिले होते. या पार्श्वभूमीवर, उत्तम बाबाने दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी एक वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यासह पाच तुरुंगाधिकारी, दोन तुरुंग कर्मचारी आणि दोन गुन्हेगार अशा नऊ जणांविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. लोकमतने शुक्रवारच्या अंकात हे वृत्त ठळकपणे प्रकाशित केल्याने राज्यभरात खळबळ उडाली. पुणे, मुंबई येथून स्थानिक कारागृह प्रशासनाकडे या संबंधाने दिवसभर विचारणा करण्यात आली. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल आज रात्री संबंधित वरिष्ठांकडे पाठविला. दरम्यान, ज्या तुरुंगाधिकाऱ्यांवर आरोप लावण्यात आले, ते सर्व आज कारागृहात कर्तव्यावर आलेच नाहीत. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली.
---
असे कसे शक्य आहे?
कारागृहात दोन हजारपेक्षा जास्त कैदी असताना हा घृणास्पद प्रकार अधिकारी कसा करू शकतात, असाही प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणात सत्य काय आहे, ते जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी उत्तम बाबाची व्यवस्था वेगळ्या खोलीत असल्याचे सांगून जास्त बोलण्याचे टाळले.
---
मोठा पोलीस बंदोबस्त
लोकमतने या खळबळजनक प्रकरणाचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची डिजिटल क्लिप सर्वत्र व्हायरल झाली. या पार्श्वभूमीवर, तृतीयपंथी, किन्नरांचा मोठा जमाव कारागृहासमोरच्या परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यापूर्वी त्यांनी घातलेला हैदोस लक्षात घेऊन दुपारपासून मोठा पोलीस बंदोबस्त कारागृहासमोर लावण्यात आला. मात्र, सायंकाळपर्यंत कोणीही तिकडे फिरकले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
---