दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या ‘वाको नाम कबीर’ महोत्सवाला प्रारंभ : शब्द आणि सुफी गायनाची रंगतनागपूर : संत कबीर म्हणजे मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सोपे आणि सहजपणे सांगणारे संत. धार्मिक तेढ संपवून हिंदु-मुस्लिमांचे ऐक्य साधणाऱ्या संत कबीरांनी धर्माच्या अवडंबरावर आणि कर्मकांडावर त्यांच्या रचनातून प्रहार केला. निर्गुण ब्रह्माचे उपासक असलेल्या कबीरांनी भारतीय समाजाला नवी दृष्टी दिली आणि सर्व धर्मांना मानवतेच्या एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे दोहे, रचना सहजपणे कुणालाही क्लिष्ट तत्त्वज्ञान सोपे करुन सांगणाऱ्या आहेत. संत कबीरांच्या कार्याची आणि विचारांची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी ‘वाको नाम कबीर’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शास्त्रीय गायन, सुफी गायनातून संत कबीरांच्या शब्दचा अर्थ उलगडण्याच्या सादरीकरणाने उपस्थितांना पावित्र्याच्या अनुभूतीचा आनंद दिला. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी संत कबीरांच्या रचनांवर आधारित सादरीकरणाने महोत्सवात अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. जगविख्यात शबद गायक उस्ताद बलजित सिंह नामधारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शब्द सादर करुन रसिकांची दाद घेतली. यानंतर राजस्थानचे सुप्रसिद्ध सुफी व कबीर गायक मुख्तीयार अली यांच्या सुफी गायनाने महोत्सवाला चार चाँद लावले. बलजित सिंह नामधारी यांनी केदार रागातील शबदने गायनाला प्रारंभ केला आणि वातावरण पावित्र्याने भारले गेले. कबीरांचे दोहे आपल्याला माहिती आहेत पण त्याचे शास्त्रीय गायन फारसे ऐकलेले नाही. शबदचे हे गायन ऐकण्याचा अनुभव नागपूरकरांसाठी वेगळा होता. त्यांना गुरुमितसिंह नामधारी यांनी रबाब या वाद्यावर साथ केली. बलजितसिंह यांनी गायनासह तार शहनाई या वाद्यावर वादन करून रसिकांना जिंकले. याप्रसंगी बलजित सिंह यांनी राग खमाज आणि मिश्र भैरवीत गायन सादर केले. त्यांना तबल्यावर इंद्रदीपसिंह तर तानपुऱ्यावर पंकज रंगारी यांनी साथसंगत केली. यानंतर मुख्तीयार अली यांनी सुफी गायनाने तान छेडली आणि कार्यक्रमाला अधिक उंचावर नेले. त्यांच्या सुफी गायनाने आणि दमदार आवाजाने महोत्सवात रंगत आली. या महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक बसंतलाल शॉ, विभागीय आयुक्त अनुपकुमार आणि शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दिल्लीचे जैनेंद्रसिंग यांनी केले. (प्रतिनिधी)
संत कबीरांच्या शब्द वाणीने पावित्र्याची अनुभूती
By admin | Published: October 17, 2015 3:25 AM